ताबा प्रमाणपत्र नसतानाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्लबचे उद्घाटन करण्यास शिवसेनेचा विरोध
मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या कांदिवलीमधील भूखंडावर अनधिकृत बांधण्यात आलेल्या आणि ताबा प्रमाणपत्र नसलेल्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  १४ जुलै रोजी उद्घाटन करण्याचे घाटत आह़े  यावर आक्षेप घेऊन भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश देत स्थायी समिती अध्यक्षांनी बुधवारची बैठक तहकूब केली.
स्थानिक तरुणांना क्रिकेटचे प्रशिक्षण देता यावे, यासाठी पालिकेने खास बाब म्हणून कांदिवलीच्या महावीर नगरातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेला भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला होता. मात्र तेथे आलिशान क्लब उभा राहिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना तेथे प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे हा भूखंड पालिकेने ताब्यात घ्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सभागृह नेते यशोधर फणसे यांनी बैठकीत केली.
मुंबईतील खेळाची अनेक मैदाने विविध संस्थांना दिली असून त्यावर क्लब उभारण्यात आले आहेत. या संस्थांनी अटींचा भंग केला आहे का याची पाहणी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी केली. ‘एमसीए’च्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी परस्परांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांना दिलेल्या भूखंडांवरील क्लबची चौकशी करण्याची मागणीही नगरसेवकांकडून करण्यात आली.
शिवसेनेचा उद्या मोर्चा
या प्रकरणी ‘एमसीए’चा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे कांदिवलीच्या महावीर नगरात १२ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, आमदार रामदास कदम, विनोद घोसाळकर सहभागी होणार आहेत.