मुंबई : लग्नादरम्यान चांदीच्या ताटात जेवण न मिळाल्याने नवरदेवाने नाराज होणे ही तात्पुरती समस्या असून त्याला हुंड्याची मागणी म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, हुंड्याची मागणी आणि शारीरिक छळवणूक केल्याच्या आरोपांतून पुणेस्थित ३३ वर्षांच्या शेतकरी तरूणाची निर्दोष सुटका केली. याचिकाकर्ता लग्नादरम्यान चांदीच्या ताटात जेवण न मिळाल्याने नाराज झाला होता. त्याची ही नाराजी तात्पुरती होती. त्याच्या या कृतीला हुंड्याची मागणी म्हणता येणार नाही. किंबहुना, लग्नानंतर याचिकाकर्ता आणि त्याची पत्नी आनंदाने एकत्र नादंत होते. त्यांना एक मुलगाही आहे, असे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी याचिकाकर्त्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रद्द करताना नमूद केले. तसेच, सरकारी पक्ष याचिकाकर्त्यावरील हुंड्याच्या मागणीचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
याचिकाकर्त्याला हुंड्याची मागणी करणे, हुंड्यासाठी शारीरिक छळ करणे या आरोपांतर्गत दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवले होते. तसेच, त्याला दोन वर्षांचा कारावास आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची निर्दोष सुटका केली होती. सत्र न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे, याचिकाकर्त्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून काम करणाऱ्या पत्नीचा याचिकाकर्त्याने आणि त्याच्या कुटुंबाने दोन वर्षे हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुनावणीच्या वेळी केला होता. लग्नाच्या वेळी चांदीचे ताट, सोन्याच्या अंगठ्या आणि इतर वस्तू आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप याचिकाकर्त्यावर होता. शिवाय, याचिकाकर्त्याने पत्नीला मारहाण केली आणि त्याच्या कुटुंबीयांनीही तिला टोमणे मारले, असा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. शिळे अन्न फेकून दिल्याने याचिकाकर्त्याने आपल्याला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे आपण बेशुद्ध पडल्याचे आणि आपल्याला रुग्णालयात दाखल केल्याचा दावा पत्नीच्या वतीने तक्रारीत करण्यात आला होता. तिच्या या दाव्याला वैद्यकीय पुराव्यांतून पुष्टी मिळते, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तथापि, पोलिसांनी या प्रकरणी चुकीचा निष्कर्ष काढल्याचा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला व वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातील विरोधाभास न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
न्यायालयाकडून याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ग्राह्य
न्यायालयानेही याचिकाकर्त्याचा दावा मान्य केला. तसेच, हुंड्याच्या मागणीशी या मारहाणीचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाही, असे आदेशात म्हटले. पत्नीला मारहाण झाल्याचे वैद्यकीय पुरावे असले तरी हुंड्यासाठी तिला मारहाण केल्याचे सिद्ध झालेले नाही. शिवाय, आरोपीविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही स्वतंत्र साक्षीदाराची तपासणी केली नाही. थोडक्यात, याचिकाकर्त्याने पत्नीच्या कुटुंबीयांकडे हुंड्याची मागणी केल्याबद्दल फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तफावत असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
कनिष्ठ न्यायालयांवरही ताशेरे
हुंड्याशी संबंधित मागण्या आणि क्रूर वागणूक दिल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत. परंतु, याचिकाकर्त्यावरील हे आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे स्पष्ट करताना दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयानेही ही बाब विचारात घेतली नसल्याचे ताशेरे न्यायमूर्ती डिगे यांच्या एकलपीठाने ओढले.
© The Indian Express (P) Ltd