संसदीय लोकशाहीला चर्चा, वाद-विवाद आणि निर्णय अभिप्रेत आहे. परंतु अलीकडे स्वत:ही काही करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही, अशी विद्ध्वंसक प्रवृत्ती बळावत चालली आहे. अशी वृत्ती व कृती लोकशाहीला मान्य नाही, असे उद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले.
‘जमनालाल बजाज फाऊंडेशन’चा ३६ वा पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करणारे जी.व्ही. सुब्बा राव, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरातून ग्रामीण विकासाचे कार्य करणाऱ्या श्रीमती स्नेहलता नाथ, स्त्रिया व मुलांच्या विकासासाठी झटणाऱ्या विद्या दास आणि भारताबाहेर गांधीवादी विचारांचा प्रचार व प्रसार करणारे जीन मॅरी मूलर यांना जमनालाल बजाज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, निवृत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल बजाज, रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा गांधीजींनी जमनालाल बजाज यांना आपला पाचवा पुत्र मानले होते. गांधीजींनी पुकारलेल्या अनेक सत्याग्रहात जमनालाल सहभागी झाले होते. स्वातंत्र्याइतकीच मानवाची सेवा महत्त्वाची आहे, असे गांधीजी म्हणत. मानव सेवा हा गांधीजींचा विचार त्यांनी आत्मसात केला होता, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी या वेळी काढले.  
आयुष्यातील अनेक वर्षे आपण संसदीय राजकारणात घालविली. लोकशाही म्हणजे चर्चा (डिस्कशन), वादविवाद(डिबेट) आणि निर्णय( डिसिझन). परंतु आता अलीकडे त्यात आता विद्ध्वंसक प्रवृत्तीने शिरकाव केला आहे, हा चौथा डी (डिसरप्शन) आहे. अशा वृत्तीने वा कृतीने लोकशाही चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा