मुंबई : तब्बल १५४ वर्षे जुना ब्रिटिशकालिन कर्नाक उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील पाडकामाला सुरुवात झाली असून तीन तासांचे तब्बल ३० मेगाब्लाॅक घेऊन काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. उड्डाणपुलाचे पाडकाम तीन महिने चालणार असून या कामांत एक २७ तासांचा मोठा मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लाॅकसाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी आवश्यक असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!
नागरिकांच्या सोयीसाठी सीएसएमटी आणि मशीद बंदर स्थानकादरम्यान १८६८ साली कर्नाक उड्डाणपूल बांधण्यात आला होता. कालौघात तो धोकादायक बनला. परिणामी, २२ ऑगस्ट रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि २ सप्टेंबरपासून रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली. या पाडकामासाठी रेल्वेने कंत्राट दिले आहे. रेल्वे हद्दीतील कर्नाक उड्डाणपुलाची लांबी ५० मीटर लांब आणि रुंदी १८ मीटर आहे. या पुलाखाली उपनगरीय रेल्वे मार्गिकांबरोबरच मेल-एक्स्प्रेस, तसेच यार्डच्या मार्गिकाही आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या पुलावर मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरणही करण्यात आले होते.
सध्या पुलाचे पाडकाम सुरू झाले असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर काँक्रिट काढण्यात आले आहे. सुमारे एक हजार क्युबीक मीटर इतके काँक्रिट काढण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या अभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास एक महिना लागणार आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत पुलाचे पाडकाम करण्यात येणार असून काही महत्त्वाच्या कामांसाठी तीन तासांचे लहान ३० मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहेत. रेल्वेकडून मंजुरी मिळताच हे ब्लाॅक घेऊन पाडकाम करण्यात येणार आहे. याशिवाय एक सलग २७ तासांचा मेगाब्लाॅक घेण्याचे नियोजन असून त्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची आवश्यकता आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. उर्वरित मेगाब्लाॅक हे विभागीय पातळीवर घेण्यात येत असून ते मध्यरात्री किंवा पहाटे घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : वाहतूक पोलिसाला मारहाण करणारा वाहनचालक अटेकत
गर्डरचे काम पंजाबमध्ये
कर्नाक उड्डाणपुलासाठी गर्डर बनविण्याचे काम पंजाबमध्ये करण्यात येत असून जुन्या पुलाच्या तुलनेत नवीन पुलाची लांबी अधिक असेल. ५० ऐवजी ७० मीटर लांबीचा हा पूल असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा पूल सहा खांबावर उभा होता. मात्र भविष्यात पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा पूल बिनखांबी असेल.
२७ तासांच्या मेगाब्लाॅकमध्ये काय
या कामासाठी अखेरच्या टप्प्यात २७ तासांचा मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मात्र त्याबाबत रेल्वे बोर्ड अंतिम निर्णय घेणार आहे. या ब्लाॅकमध्ये पुलावरील गर्डर काढण्यात येईल. तसेच कामांमुळे ओव्हरहेड वायरची कोणतीही हानी होऊ नये यासाठी पुलाखाली असलेल्या ओव्हरहेड वायर हटविण्यात येतील. तत्पूर्वी ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडीत करावा लागणार आहे. यावेळी ३५० हून अधिक टनाच्या चार क्रेन, मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि अन्य यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. २७ तासांचा मेगाब्लाॅक घेताना सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस वाहतुकही बंद ठेवावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकल भायखळा तसेच वडाळा येथूनच डाऊनला सुटतील.