वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त नगर येथे तीन दिवसांत चारशेहून अधिक झोपडय़ा उभ्या राहत असतानाही सर्व शासकीय यंत्रणा थंड असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्यापर्यंत या रिकाम्या झोपडय़ांवर कारवाई न केल्यास झोपडय़ा तोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे वांद्रे पोलीस, महापालिका आणि एमएसआरडीचे अधिकारी खडबडून जागे झाले असून त्यांनी कारवाईची तयारी सुरू केली आहे.
नर्गिस दत्त नगरच्या मागे असलेली ही मोकळी जागा म्हाडाची असून म्हाडाने ही जागा एमएसआरडीसीला दिली आहे. मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष तुषार आफळे यांनी झोपडय़ांचे बांधकाम सुरू झाल्याचे समजताच स्थानिक पोलीस व पालिकेकडे धाव घेतली. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी कारवाईस टाळाटाळ केली. कार्यकर्त्यांनी म्हाडाच्या कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली तेव्हा ही जागा आम्ही एमएसआरडीसीला दिली असल्याने तुम्ही त्यांच्याकडे जा, असा सल्ला देण्यात आला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना छायाचित्रे दाखवून तुम्ही तक्रार दाखल करणार आहात की नाही, असा सवाल केला तेव्हा कुठे त्यांच्या एका अधिकाऱ्याने जाऊन पाहाणी केली. त्यानंतर आफळे व अन्य मनसे कार्यकर्त्यांनी शंभर क्रमांवर सातत्याने फोन करून अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत असून कारवाई करण्याची विनंती केली. वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तेथेही या झोपडय़ांच्या बांधकामाचे फोटो दाखवले. अखेर कोणीच कारवाई करत नाही, हे पाहून तुषार आफळे यांनी मनसेच उद्या या झोपडय़ांवर मनसेचा हातोडा पडेल, असा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून उद्याच कारवाई करण्याचे आश्वासन मनसेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.

Story img Loader