लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेवरील शीव स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन शीव उड्डाणपुलाचे पाडकाम २९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शीव उड्डाणपुलाचा वापर करणाऱ्या लाखो वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच येथून रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही ये-जा करणाणे अवघड बनणार आहे.
अंधेरी येथील गोखले पूल पडल्याने मुंबईतील ब्रिटिशकालीन आणि जुन्या पुलांची तपासणी आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आली. १९१२ साली बांधण्यात आलेला शीव रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल जीर्ण अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी, जुना पूल तोडून नवीन प्रशस्त पूल बांधण्यात येणार आहे.
आणखी वाचा-मुंबई : आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या
मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने शीव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. या पुलाच्या पाडकामाला २० जानेवारी २०२४ रोजी सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, स्थानिक रहिवाशांनी केलेला विरोध आणि राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते. आता २९ फेब्रुवारी रोजी पुलाचे पाडकाम करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केल्यानंतर २४ महिन्यांमध्ये पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तीन महिने पुलाचे पाडकाम पूर्ण करून, टप्प्याटप्याने पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका करणार आहे. मध्य रेल्वे २३ कोटी रुपये आणि मुंबई महानगरपालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे.
आयआयटी मुंबईत्यांच्या संरचनात्मक तपासणीच्या अहवालात विद्यमान उड्डाणपूल तोडून त्याजागी स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह नवीन उड्डाणपूल बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे. विद्यमान पूल सीएसएमटी – कुर्ला दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामात अडथळा बनला आहे. त्यामुळे जुना उड्डाणपूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.
शीव उड्डाणपूल धारावी, एलबीएस रोड आणि पूर्व द्रुतगतीमार्गाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू झाल्यास पूर्व-पश्चिम वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तसेच सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोडवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हा पूल पाडल्यानंतर नोकरदार वर्ग, विद्यार्थी – पालक, व्यावसायीकांना प्रवास करणे गैरसोयीचे होणार आहे.