मुंबई : मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन ११२ वर्षे जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामाला वेग आला आहे. मध्य रेल्वेने नुकताच सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान मेगाब्लाॅक घेऊन सात तुळया हटविण्याचे काम पूर्ण केले. आता इतर कामेही वेगात करण्यात येत आहेत.
मुंबईतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा शीव उड्डाणपूल १ ऑगस्ट २०२४ रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वांद्रे – कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा शीव स्थानकाच्या सीएसएमटी दिशेकडील उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा पूल होता. या पुलावरून दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक वाहने जात-येत होती. मात्र हा पूल जीर्ण झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शीव उड्डाणपूल सीएसएमटी – कुर्लादरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामात अडथळा बनत होता. पुढील दोन वर्षांमध्ये पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
प्रस्तावित नवीन उड्डाणपूल ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा पूल असणार आहे. मध्य रेल्वेने मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने शीव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलच्या जागी नवीन उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची योजना आखली आहे.
मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने शीव रेल्वे स्थानकाजवळ जुन्या रेल्वे पुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी साधारण २३ कोटी रुपये मध्य रेल्वे आणि २६ कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबईने (आयआयटी ) त्यांच्या संरचनात्मक तपासणी अहवालामध्ये विद्यमान उड्डाणपूल तोडण्याची आणि त्याजागी स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह नवीन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करून २४ महिन्यांच्या आत तो पाडून नवा पूल बांधण्याचा रेल्वेचा मानस आहे.
पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण होणार
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प एमयूटीपी-२ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्लादरम्यान पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्प पूर्ण होणार आहे. सीएसएमटीतील जागेच्या अडचणीमुळे कुर्ला – परळ आणि परळ – सीएसएमटी असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा पूर्ण करताना शीव रेल्वे उड्डाणपूल अडथळा असल्याने तो पाडून त्याजागी नवा पूल उभारण्यात येणार आहे. त्यानुसार या पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे.