व्यापारीवर्गाला भीती
निश्चलनीकरणाने भ्रष्टाचार संपुष्टात येवो ना येवो, परंतु पुरेशा सुटय़ा नोटा बाजारात उपलब्ध नसल्याने लहानमोठय़ा उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. रोजच्या व्यवसायावर तगणारे व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणारे कामगार, बिगारी यांना नोटाबंदीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. निर्णय योग्य असला तरी नीट अंमलबजावणी होत नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया मुंबईतील व्यापारी मंडळी व्यक्त करत आहेत. तसेच पाचशेच्या पुरेशा नोटा उपलब्ध नसल्याने आणखी सहा महिने तरी ही मंदी कायम राहील, अशी भीती व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीतील आर्थिक व्यवहारांवर निश्चलनीकरणाचा मोठा परिणाम झाल्याने किरकोळ, घाऊक व्यापाराचे क्षेत्र डबघाईला आले आहे. या निर्णयाने आमच्या गुंतवणूक क्षमतेवर परिणाम झाला असून पुढील सहा महिन्यांत वातावरण पूर्वपदावर न आल्यास बाजारात महागाई निर्माण होऊ शकेल, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. निर्णय सकारात्मक असला तरी आमचा व्यापार कमी झाला आहे. आम्ही गिऱ्हाईकांना ऑनलाइन व्यवहार करण्यास सांगतो; पण रोजचे व्यवहार ऑनलाइनने करणे कठीण जात असल्याचे ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे आशीष मेहता यांनी सांगितले. मेहता टिम्बर आणि प्लायवूडच्या (लाकूड सामान) व्यवसायात असून टेम्पोचालकांना, सुतारांना, कामगारांना रोजच्या रोज रोख पैसे द्यावे लागतात. त्यासाठी लवकरात लवकर ५००च्या नव्या नोटा बाजारात यायला हव्यात. या नोटा नसल्याने नागरिकांना जसा त्रास होतो आहे, त्याच्या कैकपटीने आम्हाला त्रास होतो आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली, तर निश्चलनीकरणाचा निर्णय धक्कादायक असून इथून पुढे परिस्थिती कधीपर्यंत निवळेल याबद्दल काहीच खात्री देता येत नाही, अशा शब्दांत इलेक्ट्रिकल वस्तूंचे होलसेल व्यापारी कमलेश मोदी यांनी हतबलता व्यक्त केली.
घाऊक व्यापाऱ्यांच्या अडचणी
- टेम्पोचालक, सुतार, रंगारी, बिगारी आदी अशा सर्व तऱ्हेच्या कामगारांकडे सुटे पैसे उपलब्ध नाहीत.
- ५००च्या पुरेशा नोटा येत्या काही दिवसांत न आल्यास व्यापार करणे अवघड.
- ऑनलाइन व्यवहारांमध्ये जास्तीचा कर भरावा लागत असल्याने व्यापारी हा मार्ग अनुसरण्यास नाखूश.
- गेल्या ५० दिवसांत पैशाअभावी अनेक व्यवहार रखडले असून व्यावसायिक विश्वासार्हता धोक्यात येत आहे. यावर वेळीच उपाय न शोधल्यास संकटाच्या खाईत लोटले जाण्याची भीती
‘रोकडरहित’वर कर नको
कार्ड स्वाइप करताना किंवा ऑनलाइन व्यवहार करताना जो कर घेतला जातो तो आधी सरकारने बंद करावा. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात. अशा करांमुळे रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन कसे मिळेल? हा कर बंद करावा यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत.
– किशोर शहा, फेडरेशन ऑफ मुंबई रिटेल क्लोथ डिलर असोसिएशन
सरकारने काय साध्य केले?
नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा वगैरे काही बसणार नाही. बाजारात ५००च्या व अन्य सुटय़ा नोटांची कमतरता असताना दोन हजाराच्या नोटा आणून सरकारने काय साध्य केले? नोटाबंदीचा निर्णय घेताना अजिबात नियोजन नव्हते. लहानसहान व्यवहारांकरिता पेटीएम, डेबिट कार्ड आदींचा वापर करणे निव्वळ अशक्य आहे.
– राजीव खंडेलवाल, दारूखाना आयर्न व स्टील र्मचट्स असोसिएशन