देशभरात नोटाजप्तीचे सत्र सुरू असून, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मुंबई विमानतळावरून ६९ लाखांची रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या रकमेत २००० रुपयांच्या नवीन नोटांचाही समावेश आहे. सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने ही कारवाई केली असून, याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रकरणात ४३ लाखांचे परकीय चलन जप्त केले असून, ते तीन प्रवासी हैदराबाद येथून घेऊन आले होते. शेख वाहिद अली, मोहम्मद सोहेल आणि शेख पाशा अशी त्यांची नावे असल्याची माहिती सीमाशुल्क विभागातील सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात सौदीमध्ये गेलो असताना, ही रक्कम भारतात घेऊन आलो होतो. मात्र, सीमाशुल्क अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती, असे अटक केलेल्या तिघांनी सांगितले. मुंबईत या चलनाच्या बदल्यात चांगले पैसै मिळतील, अशी आशा होती, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी तिघांविरोधात ‘फेमा’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तर दुसऱ्या एका प्रकरणात दुबईला जाण्याच्या तयारीत असताना आरिफ कोयांते या व्यक्तीकडून २५ लाखांची रोकड जप्त केली आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या सर्व नोटा २००० रुपयांच्या आहेत. आरिफविरोधात सीमाशुल्क कायदा आणि फेमा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वीही मुंबई विमानतळावर एका तरुणाकडून २८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. मुंबईहून दुबईला हा तरुण जात होता. जप्त केलेल्या नोटांमध्ये दोन हजाराच्या नोटांचा समावेश होता. विशेष म्हणजे कुकर, खेळणी आणि जिन्समधून अश्रफ वितील हा तरुण दोन हजारांच्या नव्या नोटा दुबईला घेऊन जात होता. अश्रफ २८ लाखांची रोकड नव्या नोटांच्या स्वरुपात दुबईला का घेऊन जात होता, याची चौकशी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

Story img Loader