मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांची संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा ही प्रादुर्भाव कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे.

मागील आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी, लेप्टोचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात १२ जुलैला लेप्टोचे पाच रुग्णांची नोंद झाली होती. मागील आठवडाभरात यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. जूनमध्ये शहरात लेप्टोचे १२ रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्याने १७ जुलैपर्यंत ११ रुग्णांची नोंद झाली आहे.

शहरात डेंग्यूचा प्रसारही कायम असून जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३९ होती. हिवतापाचा प्रादुर्भावही सुरूच असून जुलैमध्ये २४३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये ३५० रुग्ण आढळले होते. डेंग्यूचा प्रादुर्भाव असला तरी जुलैमध्ये चिकनगुनियाचे मात्र शून्य रुग्ण नोंदले आहेत.

स्वाईन फ्लूचाही प्रादुर्भाव

पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले आहे. आठवडाभरात फ्लूच्या रुग्णांची संख्या ३ वरून ११ वर गेली आहे. जानेवारी ते जुलैपर्यत राज्यात १५ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत.

प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप

मुंबई महानगरपालिकेने ७ ते १७ जुलै या काळात सात लाख ७८ हजार ७०९ कुटुंबाचे सर्वेक्षण केले आहे. साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आलेल्या ९५ हजार २१८ प्रौढांना तर २३३ बालकांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले.

ही दक्षता घ्यावी

डेंग्यू आणि लेप्टो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला नसला तरी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. साचलेल्या पाण्यातून चालू नये आणि अशा पाण्याशी संपर्क आल्यास प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी घराजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

Story img Loader