मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूची साथ पसरू लागली असून आतापर्यंत सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच डास निर्मूलनासाठी वापरले जाणारे ‘एमएल ऑईल’ आठ दिवस गायब झाल्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीत खंड पडला आणि तापाने फणफणलेल्या रुग्णांची दवाखान्यांमध्ये गर्दी वाढू लागली. आजघडीला मुंबईत डेंग्यूचे ६३५ रुग्ण असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
पावसाळा ओसरताना मुंबईत डेंग्यूने डोके वर काढले आहे. मार्चमध्ये एकाला, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाच जणांना डेंग्यूमुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे आरोग्य विभागाने मोठय़ा प्रमाणावर उपाययोजनाकरून डेंग्यू नियंत्रणाखाली आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पालिका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ६३५ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या उपलब्ध नाही. मात्र ही संख्या प्रचंड असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
डेंग्यू निर्मूलनासाठी एमएल ऑईल वापरले जाते. मात्र २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात पालिकेकडे एमएल ऑईलच नव्हते. त्यामुळे कीटकनाशक फवारणी जवळजवळ ठप्पच झाली होती. त्याशिवाय पाण्याच्या पिंपात टाकण्यात येणाऱ्या अ‍ॅबेट औषधाचा पुरवठाही कर्मचाऱ्यांना अनियमितपणे केला जात होता. त्यामुळे आरोग्य स्वयंसेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना झोपडपट्टय़ा आणि चाळींमध्ये नियमितपणे अ‍ॅबेट टाकता आले नाही, अशी कबुलीही या अधिकाऱ्याने दिली.
डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या विभागांमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
रुग्णसंख्येबाबत  संशय
प्रशासनाच्या आकडेवारीबाबत नगरसेवकांना विश्वास नाही. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या डेंग्यूच्या संख्येविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास दाखवला.
१ जून ते ६ ऑक्टोबर या काळात पालिकेच्या रुग्णालयात डेंग्यूचे ६३५ रुग्ण आढळल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी पालिकेच्या स्थायी समितीमध्ये दिली.

Story img Loader