पालिका रुग्णालयात डेंग्यूची चाचणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांतील रुग्णांना ९०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. तापाच्या साथीने बेजार झालेल्या मुंबईकरांना पालिकेने हा जोरदार झटका दिला आहे.
रोश डायग्नोस्टिक्स (ई) प्रा. लिमिटेड या कंपनीने २३ फेब्रुवारी २००७ रोजी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मोलॅक्युलर डायग्रोस्टिक रेफरन्स लॅबोरेटरी सुरू केली होती. या प्रयोगशाळेत पालिका रुग्णालयातील रुग्णांच्या लेप्टो आणि डेंग्यूच्या चाचण्या मोफत केल्या जातात. मात्र खासगी रुग्णालयांतील रुग्णांकडून लेप्टो आणि डेंग्यूच्या चाचण्यांसाठी १६०० रुपये आकारले जातात. हे शुल्क पाच वर्षांसाठी बंधनकारक होते. मात्र ६ मार्च २०१३ रोजी पाच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे पालिकेने खासगी रुग्णालयांतील डेंग्यूच्या रुग्णांचे शुल्क १६०० रुपयांवरून २५०० रुपये केले आहे. मात्र लेप्टोची चाचणी १६०० रुपयांमध्येच करण्यात येणार आहे.
डेंग्यूच्या चाचणीसाठी लागणारे एक्स्ट्रॅक्शन आणि अ‍ॅम्लिफिकेशन कीट आणि उपसाधनांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या शुल्कात वाढ करावी लागली आहे, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र एलआरएल डायग्रोस्टिक्स, मेट्रोपॉलीस, रिलायन्स, लाल पॅथॉलॉजी लॅब यांच्या तुलनेत कस्तुरबातील डेंग्यूच्या चाचणीचे वाढीव शुल्क कमी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शुल्कवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

Story img Loader