मुंबई : देशातील सर्व रक्तपेढ्यांना थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मोफत रक्तपुरवठा करणे बंधनकारक आहे. तरीही अनेक रक्तपेढ्या थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मोफत रक्तपुरवठा करीत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने यासंदर्भात केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्यांमधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला पत्र पाठवून यासंदर्भात केलेल्या कारवाईची माहिती तातडीने कळविण्याच्या सूचना केली आहे.
थॅलेसेमिया हा एक रक्ताशी संबंधित आजार असून, अनेक लहान मुले या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार झालेल्या व्यक्तीला वारंवार रक्ताची गरज भासते. सर्वसामान्यांना या आजारावरील उपचार परवडत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने या रुग्णांना मोफत रक्त व रक्त घटक पुरविण्याच्या सूचना देशातील सर्व सरकारी व खासगी रक्तपेढ्यांना दिले आहेत. या आजाराचे वेळेवर निदान करणे, या रुग्णांची विशेष काळजी घेणे आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या उपचाराचा आर्थिक भार अशा अनेक समस्या आहेत. मात्र थॅलेसेमियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य अधिकारी, डॉक्टर यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यात प्रतिबंध, तपासणी, निदान आणि व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक धोरणांवर लक्ष केंद्रित केले आहे. असे असतानाही अनेक रक्तपेढ्या थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना शुल्क आकारत असल्याचे किंवा वेळेवर रक्त व रक्त घटकांचा पुरवठा करीत नसल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे आल्या आहेत.
हेही वाचा – महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय प्रकल्पाची जाहिरात करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
मध्य प्रदेशमधील थॅलेसेमियाग्रस्त मुलाच्या कुटुंबाला उपचारादरम्यान रक्त संक्रमण प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणात रक्त पिशवी अणण्यास सांगण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची आयोगाने दखल घेत राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सर्व रुग्णालयांना रक्त संक्रमण उपचार मोफत उपलब्ध करून देण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी परिपत्रक जारी करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच थॅलेसेमियाच्या उपचाराची गरज असलेल्या मुलांना योग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल cp.neper@nic.in या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या लिकंवर पाठविण्याची सूचना आयोगाने देशातील सर्व रुग्णालये व रक्तपेढ्यांना केली आहे.