मुंबई : काही दिवसांपासून मुंबईमधील हवेचा निर्देशांक सुधारत असल्याने निदर्शनास आले आहे. मात्र गेले दोन दिवस देवनारमधील हवेची समीर ॲपवर वाईट श्रेणीत नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने देवनार परिसरात सर्वेक्षण करण्यात आले असून या परिसरात पेटविण्यात येणारी शेकोटी, तसेच जाळण्यात आलेला पालापाचोळा यामुळे तेथील हवा प्रदूषित झाल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.
मागील दोन महिने मुंबईचा हवा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदला जात होता. मात्र, मागील काही दिवसांपासून सातत्याने तो समाधानकारक श्रेणीत नोंदला जात आहे. दरम्यान, गेले दोन दिवस देवनार येथील हवेची वाईट श्रेणीत नोंद झाली आहे. ही बाब लक्षात येताच एम पूर्व विभागातील संबंधित अभियंता, तसेच पर्यावरण विभगातील पथकाने देवनार परिसराचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान प्रदूषण मापक यंत्र असलेल्या ठिकाणी झोपडपट्टीत चुलीवर मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी येथे लाकडे, पालापाचोळा जाळण्यात येत असल्याचे, तसेच रात्रीच्या वेळी शेकोटी पेटविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ होऊन तेथील हवा वाईट श्रेणीत नोंदली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनेक वेळा काही भागांत वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यायाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >>> कामाठीपुरा पुनर्विकास : सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी तीन कंपन्या उत्सुक
रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवू नये, तसेच पालापाचोळा जाळू नये, असे आवाहन एम पूर्व विभागातील अभियंत्यांनी येथील झोपडपट्टीतील रहिवाशांना केले. तसेच प्रदूषण मापक असलेल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, पर्यावरण विभागाने मुंबई शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी बांधकाम विकासक, महानगरपालिका यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तसेच डिप क्लिनिंग ड्राईव्ह अभियानाची अमलबजावणी करण्यात आल्याने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दोन महिन्यांच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा प्रदूषण मापनासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १४ केंद्रे, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे यांची ९ केंद्रे, तर पालिकेची ५ केंद्रे मुंबईत स्थापित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर १ नोव्हेंबर २०२३ रोजी हवेचा दर्जा खालावल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, आता वायू प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपायांच्या अमलबजावणीनंतर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून कुलाबा, कांदिवली, मुलुंड, शीव आणि वरळीतील हवा गुणवत्ता निर्देशांक जवळपास ५० टक्क्यांनी सुधारला आहे.