देवनार कचराभूमीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी सकाळी पुन्हा एकदा परिसरात धुराचे लोट दिसू लागले. कचऱ्याला आग लागल्याने निर्माण झालेल्या धुराने देवनारच्या आसपास राहणाऱ्या अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. सध्या या ठिकाणी अग्निशामक दलाचे ११ बंब आणि पाण्याचे ८ टॅंकर आग विझवण्याचे काम करीत आहेत.
देवनार कचराभूमीला शनिवारी दुपारी लागलेल्या आगीने रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अक्राळविक्राळ रूप धारण केले. अग्निशमन दलाचे आठ बंब आणि पाण्याच्या आठ टँकरच्या मदतीने रविवारी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे संध्याकाळच्या सुमारास देवनार, गोवंडी, मानखुर्दबरोबरच नवी मुंबईत वाशी, कोपरखैरणे भागात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. रफिक नगरच्या दिशेला देवनार कचराभूमीतील कचऱ्याने शनिवारी दुपारी पुन्हा एकदा पेट घेतला. आग हळूहळू पसरत गेली आणि ५०० चौरस मीटर क्षेत्र आगीच्या विळख्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र कचराभूमीत सुस्थितीतील रस्ते नसल्याने अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे येत होते.