मुंबई: गेल्या ४० वर्षांपासून देवनार परिसरात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानांवर पालिकेच्या एम पूर्व विभागाने तोडक कारवाई केली असून ही दुकाने जमीनदोस्त झाली आहेत. पालिकेने या दुकानदारांना दहिसर येथे पर्यायी जागा दिली आहे. मात्र आम्हाला याच परिसरात दुकाने द्यावीत, अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे.

बेस्टच्या देवनार बस आगार परिसरात १९८२ पासून अनेक किराणा आणि जनरल सामानाची दुकाने होती. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेने येथील काही दुकाने यापूर्वी जमीनदोस्त केली होती. त्यानंतर येथील ११ दुकानांवर पालिकेने २०१८ मध्ये नोटीस बजावून त्यांना दहिसर येथे पर्यायी जागा उपलब्ध केली. मात्र संपूर्ण आयुष्य याच परिसरात गेल्याने येथील दुकानदारांनी दहिसर येथे जाण्यास नकार दिला. त्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून याच ठिकाणी हे दुकानदार व्यवसाय करीत होते. मात्र पालिकेने सोमवारी यापैकी नऊ दुकानांवर कारवाई करून ती जमीनदोस्त केली.

या कारवाईमुळे अनेक दुकानदारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. पालिकेने आम्हाला चेंबूर, देवनार आणि गोवंडी परिसरात दुकाने द्यावीत, अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे. अन्यथा आम्ही कुटुंबियांना सोबत घेऊन पालिका कार्यालयाबाहेर दुकाने थाटू, असा इशारा काही दुकानदारांनी दिला आहे.

Story img Loader