देवनार कचराभूमीची सुरक्षा वाऱ्यावर, सीसीटीव्हीही गायब; मुख्य अभियंत्याचे पदही वर्षभर रिक्त
देवनार कचराभूमीला लागलेल्या आगीमुळे पालिकेतील उच्चपदस्थांचा भोंगळ कारभार उघड होऊ लागला असून, गेल्या चार वर्षांत घनकचरा विभागाने भांडवली कामांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या सुमारे १६०० कोटींच्या तरतुदींपैकी जेमतेम २३० कोटी रुपयेच खर्च केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गेले वर्षभर या विभागाला मुख्य अभियंताही नेमलेला नसून, हंगामी तत्त्वावर घनकचरा विभागाचा कारभार सुरू आहे. देवनारची कचराभूमीची सुरक्षाही वाऱ्यावरच असल्यामुळे तेथे कचरामाफिया मनमानीपणे शेकडो टन कचरा टाकत असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या चार वर्षांत अर्थसंकल्पात घनकचरा विभागाच्या भांडवली कामांसाठी केलेल्या तरतुदीच्या एकचतुर्थाश रक्कमही खर्च केलेली नाही. २००९ मध्ये देवनारमधील ६५ हेक्टर जागा शास्त्रोक्त पद्धतीने बंद होणे अपेक्षित होते. तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तशी हमीही दिली होती. तथापि आजपर्यंत हे काम कंत्राटदाराकडून करून घेण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे देवनारच्या आगीने दाखवून दिले. गंभीर बाब म्हणजे घनकचरा विभागाला गेले वर्षभर पूर्णवेळ मुख्य अभियंताही नेमण्यात आला नसून, अभियंत्यांची किमान ७० पदे रिक्त असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कचरा माफियांच्या साम्राज्याला खीळ बसविण्यासाठी एक वर्षांपूर्वी पालिकेने कंत्राटदाराच्या मदतीने या कचराभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. कंत्राटाला मुदतवाढ न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने येथील सीसीटीव्ही कॅमेरे काढून नेले. तसेच सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा असल्याने कचरा माफियांकडून बेकायदेशीरपणे शेकडो टन कचरा दर दिवशी येथे टाकला जातो. त्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही.
देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात कंत्राटदार अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ३१ जानेवारीपासून त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यामुळे कंत्राटदाराने आपले कर्मचारी २५ जानेवारीपासून देवनार येथून काढून घेण्यास सुरुवात केली. कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी देवनारची पर्यायी व्यवस्था का केली नाही, असा सवाल समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत दररोज जमा होणारा सुमारे साडेनऊ हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे आव्हान असून, त्यासाठी संवेदनशील व्यक्ती विभागाच्या प्रमुखपदी असणे आवश्यक असल्याचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांवर दोषारोप
देवनार येथे कंत्राटदाराने आपली माणसे काढून घेतल्यामुळे आग लागल्यानंतर सुमारे सहा तास तेथे कोणीही फिरकले नसल्याचे रईस शेख यांचे म्हणणे असून सहा-सात कंत्राटदार या विभागाचा कारभार चालवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
घनकचरा विभागाच्या गलथान कारभाराला गेल्या काही वर्षांतील पालिका आयुक्त तसेच गेली वीस वर्षे सत्तेत असलेली शिवसेना-भाजप जबाबदार असल्याचे समाजवादी पार्टीचे रईस शेख, मनसेचे संदीप देशपांडे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.

शिवसेना-भाजप नगरसेवक दौऱ्यात मश्गूल
देवनार कचराभूमीत आग लागल्यानंतर गोवंडी, मानखुर्द, चेंबूर परिसरातच नव्हे तर दक्षिण मुंबईपासून थेट नवी मुंबईपर्यंत धुराचे साम्राज्य पसरले होते. या धुरामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पालिकेच्या स्थायी समितीमधील शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अंदमानमध्ये आहेत. आतापर्यंत मुंबईत दुर्घटना घडल्यानंतर मदतकार्यासाठी शिवसैनिक धाव घेत आले आहेत, परंतु देवनार कचराभूमीत इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक अंदमानमध्येच तळ ठोकून बसले होते. सोमवारी ते मुंबईत येणार असून, त्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.

Untitled-11

Story img Loader