मुंबईतील कचराभूमींची क्षमता संपुष्टात आल्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून काढण्यात येणारा गाळ टाकायचा कुठे असा यक्षप्रश्न पालिकेपुढे उभा राहिला होता. देवनार कचराभूमीत वारंवार लागणारी आग रोखण्यासाठी कचऱ्यावर नाल्यांतील गाळ टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र केवळ छोटय़ा नाल्यांतून उपसण्यात येणारा गाळच देवनार कचराभूमीत टाकण्यात येणार आहे. मोठय़ा नाल्यांतून उपसण्यात येणाऱ्या गाळाची कंत्राटदारांनाच विल्हेवाट लावावी लागणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेमार्फत मुंबईतील छोटय़ा आणि मोठय़ा नाल्यांची सफाई केली जाते. नाल्यातून उपसलेला गाळ पूर्वी मढ येथील कचराभूमीत टाकण्यात येत होता. परंतु मढ कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्यानंतर नाल्यांतील गाळ टाकायचा कुठे असा प्रश्न पालिकेपुढे उभा राहिला होता. अखेर नाल्यातून उपसण्यात येणाऱ्या गाळाची कंत्राटदारानेच विल्हेवाट लावावी, अशी अट निविदेमध्ये घालण्यात आली. कंत्राटदारांनी संबंधित जमीन मालकाची परवानगी घेऊन मुंबईबाहेरील खाजण जमिनीमध्ये नाल्यांतील गाळ टाकला. परंतु गेल्या वर्षी गाळ वाहून नेण्यात झालेला घोटाळा उघडकीस आला आणि गाळ नेमका कुठे टाकला गेला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी याबाबतची सर्व कंत्राटे रद्द केली.
मुंबईमधील छोटय़ा नाल्यांच्या सफाईची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयावर टाकण्यात आली आहे. गेल्या वर्षी दिलेल्या कंत्राटाच्या तुलनेत ६० टक्के रक्कम पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाला देण्यात येणार आहेत. या निधीमध्ये ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ही कामे नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे आदेश अजय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
छोटय़ा नाल्यांतून उपसण्यात येणारा गाळ देवनार कचराभूमीत टाकण्याचे आदेश अजय मेहता यांनी दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले आहेत.
देवनार कचराभूमीत वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. कचऱ्यावर नाल्यातील गाळाचे आच्छादन केल्यानंतर आगीच्या घटना टाळता येऊ शकतील, असा त्यामागचा हेतू आहे.

Story img Loader