आगामी वर्षांसाठी श्वानदंशावरील लशीची दुपटीहून अधिक खरेदी करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतल्यामुळे महाराष्ट्रात कुत्रे चावण्याचे प्रमाण अचानक वाढले की कंत्राटदारांचे चांगभले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी श्वानदंश लशीच्या पाच लाख ३८ हजार मात्रांसाठी निविदा काढणाऱ्या आरोग्य विभागाने पुढील वर्षांसाठी मात्र, लशीच्या तब्बल १३ लाख मात्रांची मागणी नोंदविल्यामुळे आरोग्य विभागाला कोणता दृष्टान्त झाला, याची चर्चा खात्यातच सुरू आहे.
आरोग्य विभागाच्याच एका अहवालानुसार राज्यात दोन लाख आठ हजार लोकांना श्वानदंश झाला. मुंबई महापालिकेच्या हद्दीत ८८ हजार, तर अन्य महापालिका तसेच राज्याच्या १४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या परिघात श्वानदंशाच्या वर्षांकाठी सुमारे ६० हजार घटना घडतात. ही आकडेवारी पाहता, पुढील वर्षांसाठी १३ लाख श्वानदंशाच्या लशी खरेदी करण्याचे कारणच काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भारत बायोटेक नावाच्या कंपनीला गेल्या वर्षी २०,००० मात्रांचा पुरवठा करायचा होता. प्रत्यक्षात त्यांना ६७ हजार लशींचा पुरवठा करण्याचे कार्यादेश देण्यात आले. हा पुरवठा १३ जुलैपर्यंत करणे बंधनकारक असतानाही त्यांनी तो केला नाही. इंडियन अम्युनोलॉजी या केंद्र शासनाच्या अंगीकृत कंपनीला पाच लाख नऊ हजार लशींचा पुरवठा करण्याचे कार्यादेश देऊनही प्रत्यक्षात त्यांच्याकडून केवळ चार लाख दहा हजार लशींचीच खरेदी करण्यात आली. ज्या भारत बायोटेक कंपनीने आरोग्य विभागाला लशींचा पुरवठा केला नाही त्यांनी अन्य राज्यात मात्र याच कालावधीत लशींचा पुरवठा केल्याचा आक्षेप आहे. मात्र त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही.
आगामी वर्षांत कुत्रे चावण्याचे प्रमाण वाढणार असा साक्षात्कार आरोग्य विभागाला झाला असावा, असा उपरोधिक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लगावला असून, या साऱ्या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची तसेच गेल्या तीन वर्षांत नेमक्या किती लशींचा वापर झाला, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भारत बायोटेकच्या लस खरेदी प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी फडणवीस यांनी आपल्या पत्रात केली आहे.
‘एकूण गरज लक्षात घेऊन १३ लाख लशींच्या पुरवठय़ाची निविदा काढण्यात आली आहे. मात्र आवश्यकतेनुसार तीन टप्प्यात ही खरेदी करण्यात येणार असल्याने अतिरिक्त खरेदी होणार नाही. ही खरेदी १८ महिन्यांसाठी असून भारत बायोटेकची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.’
आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा