वादग्रस्त आणि घटनाबाह्य असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाचा हिशेब न देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासह राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचीही टोलवाटोलवी सुरू आहे. यात कहर म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनास कोणत्याही अटींशिवाय आर्थिक मदत देण्यात आली होती, असे धादांत खोटे उत्तर मराठी भाषा विभागाने संबंधिताना दिले आहे.
सॅनहोजे आणि दुबई येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनांसाठी राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात आले होते. ही संमेलने घटनाबाह्य असल्याने खर्चाचा आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा विनियोग कसा झाला, त्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात
आली.
वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही संबंधित अर्जदाराला मराठी भाषा विभागाकडून वा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून अद्याप माहिती मिळालेली नाही.