मुंबई: मुंबईतील विविध भागामध्ये जाऊन तेथील नागरिकांना मौखिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्या मुखाशी संबंधित विकारावर उपचार करणे, आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करणे अशा विविध माध्यमातून शहरातील नागरिकांच्या मुखाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग सातत्याने कार्यरत आहे. या विभागामार्फत अधिकाधिक नागरिकांच्या मुखातील विकारांवर उपचार करता यावेत, यासाठी नायर महाविद्यालयाने सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागामध्ये आवश्यक असलेल्या यंत्रणा सज्ज करण्यात आल्या असून, नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पान, तंबाखू, गुटखा, सिगारेट, सुपारी, चुना आदी पदार्थ खाल्ल्याने नागरिकांचे मौखिक आरोग्य बिघडते. तर अनेकांना मुख कर्करोग होतो. यामध्ये संबंधित व्यक्तीच्या मुखातील त्वचा कडक होऊन हळूहळू त्याचे ताेंड उघडणे बंद होते. त्यामुळे अशा व्यक्तींवर उपचार होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागातर्फे मालाडमधील मालवणी, चिता कॅम्प परिसरातील नागरिकांसह अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, तुरुंगातील कैदी, वेश्यावस्तीमध्ये दंत आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील झोपडपट्टी भागासह विविध संस्था आणि ग्रामीण भागात जाऊन नायर दंत महाविद्यालयातील डॉक्टर मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करीत आहेत. यासाठी रुग्णालयाकडे असलेल्या दोन मोबाइल व्हॅनचा वापर करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये आढळणाऱ्या व्यक्तींवर मोबाइल व्हॅनमध्ये उपचार करण्यात येतात. मौखिक आरोग्य बिघडलेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. शिबिराच्या माध्यमातून येणारे आणि थेट रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा >>>मुंबई: महिला पोलिसांबद्दल ट्वीटरवर अश्लील विधान करणाऱ्याविरोधात गुन्हा

रुग्णांच्या तुलनेमध्ये नायर दंत महाविद्यालयात फक्त चार खुर्च्या असून रुग्णांना उपचारासाठी ताटकळत राहावे लागत आहे. रुग्णांवर जलदगतीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग अद्ययावत करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. सध्या रुग्णालयात केवळ चार खुर्च्या असून आता १३ कुर्च्यांची भर टाकून त्यांची संख्या १७ करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच रुग्णांना अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच रुग्णालयाच्या इमारतीमधील सहाव्या मजल्यावर या विभागाला स्वतंत्र जागा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Department of public health dentistry in nair dental college to be updated mumbai print news amy
Show comments