मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जलसाठा खालावला आहे. त्यामुळे लवकरच समाधानकारक पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा उत्तम होता. मात्र २० जूनच्या आकडेवारीनुसार जलसाठा मागील दोन वर्षांच्या तुलनेत खालावला आहे.एप्रिलच्या सुरुवातीला धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा होता. मात्र आता तो जेमतेम १० टक्क्यांवर आला आहे. जूनचा निम्मा महिना कोरडा गेला असून आताच पावसाने ताल धरण्यास सुरुवात केली आहे. धरणातील साठ्यात वाढ होण्याइतका पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्यावरच मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.
गेल्यावर्षीच्या समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली होती.उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांमधून मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सातही तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर वर्षभर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तसेच तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल यादृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन करण्यात येते. सर्व तलाव १ ऑक्टोबरला पूर्ण क्षमतेने भरलेले असले तर वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होते. तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर पाणी कपात करण्याची वेळ येते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.