मुंबई : राज्यातील विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा व देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या ‘वॉर रुम’च्या धर्तीवर समांतर पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातील प्रकल्प सनियंत्रण कक्ष (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट) सुरूच राहणार आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यावर पवार यांनी या कक्षाचे कामकाज पुन्हा सुरू केले असून, गुरुवारी झालेल्या बैठकीत विकास प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पवार यांनी प्रशासनास दिले.

फडणवीस यांनी पहिल्या कार्यकाळात २०१४ मध्ये राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात ‘वॉर रुम’ सुरू केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पवार यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयातही प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ‘वॉर रुम’ सुरू केली होती. त्या वेळी प्रकल्पांशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बैठकीत पाचारण करून निर्देश देण्यात येत होते. फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यापासून मात्र पवार यांनी सनियंत्रण कक्षाची बैठक घेतली नव्हती.

पवार यांच्या वॉर रुमच्या माध्यमातून देखरेख केलेले बहुसंख्य प्रकल्प मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रुमच्या कक्षेतही घेण्यात आले आहेत. त्यामुळे फडणवीस व पवार या दोघांकडूनही स्वतंत्रपणे त्याच प्रकल्पांच्या कामांचा नियमित आढावा घेण्यात येणार का, हा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता पवार यांनी आपल्या कक्षाचे कामकाज सुरू केले आहे. या वेळी राज्यातील विकासकामे वेगाने पूर्ण करा, सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, विलंबामुळे प्रकल्पांच्या किमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर द्यावा, अशा सूचना पवार यांनी बैठकीत दिल्या.बैठकीला नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी आदी अनेक खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा’

पुण्यात ‘एम्स’ उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावण्यात यावे. पुणे शहरात दरवर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या आहेत.

प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा

अजित पवार यांनी बैठकीत लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कुल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Story img Loader