मुंबई : एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ, अभद्र शब्दांत टीका-टोमणे… गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास दररोज दिसणारं कटू चित्र. विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अखेरचं अधिवेशन असल्यानं कडवटपणा आणखी तीव्र होणंही स्वाभाविक. पण गुरुवारी विधान भवनाच्या प्रांगणात राजकीय सभ्यता आणि सौहार्दाचे काही क्षण या कडवटपणावर मात करून गेले आणि वातावरण हलकं झालं.

यातील पहिला प्रसंग आहे लिफ्टमधील योगायोगाचा… झालं असं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच वेळी विधान भवनाच्या लिफ्टमध्ये आले. अवघ्या दोन-तीन मिनिटांच्या या एकत्र ‘प्रवासा’ची चर्चा रंगली. ठाकरे यांना पत्रकार परिषदेतही यावरून छेडण्यात आलं. तेव्हा ‘ना ना करते प्यार तुम्हीं सें कर बैठे…’ असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही नाही, असं मिश्कील उत्तर ठाकरे यांनी दिलं. भेट योगायोगानं झाली आणि कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्यामुळे आता गुप्त चर्चा लिफ्टमध्येच करायला हरकत नाही असा टोला त्यांनी लगावला. या भेटीवर टिप्पणी करण्याचा मोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आवरला नाही. ‘‘त्यांनी लिफ्ट मागितली, तरी ती मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत (मुख्यमंत्री कार्यालय) पोहोचू शकत नाही. ते (ठाकरे) दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्यानं आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये एकत्र आलो आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं. लिफ्टमध्ये भेटल्यानं ते युतीत येतील, असं होत नाही,’’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

हेही वाचा >>>महायुक्तीचा संकल्प! अजितदादांच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांचा हात; सर्व समाजघटकांसाठी घोषणांचा वर्षाव

खेळीमेळीचा दुसरा प्रसंग घडला तो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात… संसदीय कार्यमंत्री या नात्यानं चंद्रकांतदादा पाटील दानवेंच्या दालनात शुभेच्छा देण्यास गेले. त्या वेळी नेमके उद्धव ठाकरे, अनिल परब आदी शिवसेना नेते तिथंच होते. दादांनी सगळ्यांना चॉकलेट दिली, तर दानवे यांनी पेढ्याचा पुडा दादांसमोर धरला. लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल पेढे वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर दादांनी एक पेढा परब यांना दिला आणि निकालाआधीच विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. यानिमित्ताने दानवेंच्या दालनात विरोधक-सत्ताधाऱ्यांत हास्यविनोद रंगलेले पाहायला मिळाले.

हे दोन प्रसंग वृत्तवाहिन्यांसाठी मेजवानीसारखेच होते. वारंवार ही दृश्यं दाखवून ठाकरे कसे भाजपच्या जवळ जात आहेत, हा शिंदे आणि काँग्रेस-पवार गटाला शह देण्याचा भाजप-ठाकरे गटाचा प्रयत्न कसा आहे यावर चर्चा घडवल्या जाऊ लागल्या. मात्र यानिमित्तानं महाराष्ट्राच्या देदीप्यमान राजकीय परंपरेचा वारसा जपला गेल्याचं आशादायी चित्र उभ्या राज्यानं पाहिलं…