मुंबई : गोरगरिबांना चांगले घर उपलब्ध करुन देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून केंद्र सरकारच्या जमिनींवरील झोपडपट्टीवासियांचेही त्याच जागी पुनर्वसन करण्यासाठी केंद्राकडूनही जमीन देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, असे आव्हाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांच्या कांदिवलीतील प्रचार कार्यालयाचे उद्धाटन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. गोयल यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन करुन फडणवीस म्हणाले,  ‘गरिबी नाही, तर गरीबांना हटवा ’ , असे काँग्रेसचे धोरण आहे. महायुतीने मात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या जागेवरच चांगले घर उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे. ज्यांच्या झोपडय़ा केंद्र सरकारच्या जमिनींवर आहेत, त्यांच्यासाठी केंद्रानेही जमिनी देण्यास मान्यता दिली आहे. देशातील सर्वसामान्यांच्या जीवनाचा कायापालट करण्यासाठी किंवा आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही गेली १० वर्षे अथकपणे प्रयत्न करीत आहेत. पुढील काळातही देशाच्या प्रगतीचे इंजिन वेगाने पुढे जावे, असे वाटत असेल, तर मोदींच्या मागे सर्वानी खंबीरपणे उभे रहावे. महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे, मोदींना मत असून विरोधात मत म्हणजे राहुल गांधींना मत आहे, हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी मुंबई उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, आमदार अतुल भातखळकर आदी उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis challenges uddhav thackeray to show the good work he has done for mumbai amy