मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपानच्या दौऱ्यासाठी रविवारी रात्री रवाना झाले. शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट)चा दर्जा देवून फडणवीस यांना जपान सरकारने आमंत्रित केले आहे. वर्सोवा-विरार सागरी सेतूसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) सह अन्य वित्तसंस्था, जपानमधील आंतरराष्ट्रीय कंपन्या आदींसमवेत फडणवीस यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या असून अनेक सामंजस्य करारही होणार आहेत.
फडणवीस यांच्यासमवेत सचिव श्रीकर परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदींचा समावेश आहे.