मुंबई : रुग्णसेवेच अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. विश्वासाने येथे येणाऱ्या रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचा ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. समारंभास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा >>>१७ अभ्यासक्रमासाठी मॉक टेस्ट, मॉक टेस्टसाठी भरावे लागणार ५०० रुपये
केईएमने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत खडतर आहे. आजही येथील रुग्णसेवा अहोरात्र सुरू आहे. येथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर जगत आहे. सेवाभाव हा परमभाव आहे, असे आपली संस्कृती सांगते. वैद्यकीय क्षेत्रात येताना डॉक्टर मंडळी सेवाधर्माची शपथ घेतात. ही शपथ घेऊनच ९९ वर्षांपूर्वी हे रुग्णालय उभे राहिले. आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांना आधार देत उभे आहे. घरातील आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो. आपुलकी असते, तशीच भावना केईएमबद्दल आहे. आरोग्य क्षेत्रातील एखाद्या संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. सांस्कृतिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएमने धरली आहे. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >>>नायगाव बीडीडीच्या जागेवर ६५ मजली तीन इमारती ,पुनर्विकासाअंतर्गत विक्री घटकातील १,८०० घरांच्या कामाला अखेर सुरुवात
केईएमसारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत. केईएममधील कर्मचाऱ्यांनी अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केली. जगातील कुठल्याही रुग्णालयामध्ये रुग्णसेवेचे असे उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येते ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचे. कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार झाले. येथील डॉक्टरांची संशोधनाची कीर्ती जगभर पसरली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
केईएमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनीकचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत. त्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे शासनाच्या वतीने आभार मानतो.
रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी, त्याचबरोबर रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करतानाच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली. या ठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम उभे करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.