मुंबई : गेले अनेक दिवस चर्चेत असलेली पालकमंत्र्यांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला रवाना होण्यापूर्वी जाहीर केली. प्रथमच सहपालकमंत्री नेमण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्याबरोबरच मुंबई शहरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा ठाकरे गटाला शह मानला जातो.
मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद आशीष शेलार यांच्याकडे असेल. गणेश नाईक यांना पालघर जिल्हा देण्यात आला आहे. धनंजय मुंडे व भरत गोगावले या कॅबिनेट मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्री सोपविण्यात आलेले नाही.
रायगडमध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी पालकमंत्री होणार, असा दावा केला होता, पण आदिती तटकरे यांना संधी मिळाल्याने गोगावले यांचा हिरमोड झाला. योगेश कदम आणि इंद्रनील नाईक यांच्याकडेही एकाही जिल्ह्याची जबाबदारी नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद ठेवले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारत नसत. पण फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवून नवीन पायंडा पाडला आहे.
पंकजांकडे जालना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीडसह पुण्याचीही जबाबदारी असेल. धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा होती. पण संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप होऊ लागल्याने मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवू नये, अशी मागणी जोर धरू लागली. पण मुंडे यांच्याकडे कोणत्याच अन्य जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आलेले नसल्याने त्यांचे राजकीय भवितव्य काय, अशी शंका घेतली जाऊ लागली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. पंकजा मुंडे या बीडच्या असल्या तरी, त्यांना जालना जिल्हा देण्यात आला.
रायगडच्या पालकमंत्रीपदारून महायुतीत प्रचंड वाद होते. कोणत्याही परिस्थितीत आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवू नये, अशी मागणी केली जात होती. शिंदे गटाचे भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी आतुर झाले होते. पण रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली. यामुळे गोगावले यांचा हिरमोड झाला.
हेही वाचा : सातव्या आयोगामुळे राज्यावर साडेतीन लाख कोटींचा बोजा!
महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना व राष्ट्रवादी दोघेही आग्रही होते. पण या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले. साताऱ्यात चार मंत्री असल्याने प्रत्येकाला पालकमंत्रीपद हवे होते. शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची तेथे वर्णी लागली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची संजय शिरसाट यांची इच्छा मात्र पूर्ण झाली. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आग्रही होते. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेेचे प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्रीपदी माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. परिणामी कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला काहीच आलेले नाही.
प्रथमच सहपालकमंत्री
राज्याच्या इतिहासात १९७२ मध्ये पालकमंत्री ही संकल्पना अस्तित्वात आल्यापासून प्रथमच तीन जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्री नेमण्यात आले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात आशीष शेलार हे पालकमंत्री तर मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री असतील. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश आबिटकर पालकमंत्री तर भाजपच्या माधुरी मिसाळ यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. गडचिरोलीमध्ये फडणवीस यांनी पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले असले तरी शिवसेनेचे आशीष जयस्वाल यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. केवळ तीन जिल्ह्यांपुरतेच सहपालकमंत्री असतील.
हेही वाचा : आमदार सुनील शिंदे यांच्या मोटारीला बेस्ट बसची धडक
मुंडे यांच्या मंत्रिपदाचे काय?
धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा होती. पण संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप होऊ लागल्याने मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवू नये, अशी मागणी होती. मुंडे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आलेले नसल्याने त्यांचे भवितव्य काय, अशी शंका घेतली जाऊ लागली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.