मुंबई : रस्ते कॉंक्रीटीकरण हाच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कायमस्वरुपी इलाज आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. रस्ते करताना गुणवत्तेशी तडजोड कदापि खपवून घेतली जात नाही. कमी गुणवत्तेचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना आतापर्यंत महानगरपालिकेने ३ कोटी ५० लाख रूपये दंड केला आहे. यापुढेही कोणताही कंत्राटदार चुकीचे काम करत असेल तर त्यास अपात्र केले जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मुंबईतील बहुतांशी रस्ते खोदून ठेवले असून मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागते. यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी मुद्दा उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती. तसेच समाजमाध्यमांवरूनही नागरिकांनी रस्ते कामांबद्दल असंख्य तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबईतील शहर आणि उपनगरातील रस्ते कामांची पाहणी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कंत्राटदारांना इशारा दिला.

या पाहणी दौऱ्याला ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मरीन लाईन्स येथील बॉम्बे हॉस्पिटल जवळील चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर, आर. एस. सप्रे मार्ग; माटुंगा परिसरातील जामे जमशेद मार्ग आणि चेंबूर परिसरातील मार्ग क्रमांक २१ इत्यादी रस्ते कामांची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तअभिजीत बांगर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना खड्डेमुक्त रस्त्यांचा संकल्प सोडला होता. त्याच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेने दोन टप्प्यात रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी कंत्राटे दिली. ही कामे सध्या सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची काँक्रीटीकरण कामे दोन टप्प्यांमध्ये सुरू आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेली काँक्रीटीकरणाची कामे ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. काँक्रीटीकरणाची कामे दर्जेदार व्हावीत, गुणवत्तेशी तडजोड केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूक योग्य करावी. मनुष्यप्रवेशिकांची (मॅनहोल), रस्त्यांलगतच्या सांडपाणी वाहिन्यांची प्राधान्याने स्वच्छता करावी, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.

‘खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार’ प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आता सिमेंट काँक्रीटचे रस्ते केल्यानंतर कोणताही रस्ता खोदला जाणार नाही आणि रस्त्यांंवर खड्डे पडणार नाहीत. खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्ते कामे करताना गुणवत्तेशी तडजोड कदापि खपवून घेतली जाणार नाही. अपेक्षेप्रमाणे रस्ते गुणवत्तापूर्ण व्हावेत, यासाठी जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सन्मान करण्यात येईल. तर, जे अधिकारी कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.