मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री किंवा आपण थेट सांगितले तरच ते काम करावे. अन्य कुणाचे आदेश मानू नयेत, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या आहेत.
म्हाडा व झोपु प्राधिकरणाची आढावा बैठक म्हाडाच्या गृहनिर्माण भवनात बोलविण्यात आली होती. त्यावेळी या सूचना दिल्या. कुठलेही नियमबाह्य काम करू नका. लोकांना फायदा होईल असे वागा. कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत. अडचणी असतील तर जरूर सांगा, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा >>>महिला आमदाराला भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात पोहोचले; म्हणाले, “दुर्धर आजाराशी…”
गृहनिर्माण विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे आल्यानंतर पहिल्यांदाच अशी बैठक बोलाविण्यात आली होती.
म्हाडा वा झोपु प्राधिकरणात मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी दूरध्वनी करून कामे सांगितली जातात. संबंधित अधिकाऱ्यांना ती कामे करावी लागतात. मात्र यापुढे मुख्यमंत्री किंवा आपण सांगितल्याशिवाय ते ग्राह्य मानू नये अशा सूचनाच उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे म्हाडा वा झोपु प्राधिकरणाचे अधिकारीही सुखावले आहेत. खासदार, आमदार, नगरसेवकांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनही एखाद्या कामासाठी दबाव टाकला जातो. तेव्हा जे नियमात असेल तेच करा, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. “एखाद्या अडचणीमुळे कुठलेही काम अडवून ठेवू नका. ते आपल्यापर्यंत आणा. अडचण कशी सोडवता येईल ते पाहू. पण विनाकारण फायली अडवून ठेवू नका,ʼʼ असा सल्लाही उपमुख्यमंत्र्यांनी दिला.