मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी रविवारी सकाळी पुन्हा चर्चा केली. शिवसेनेमुळे भाजपला तीन वर्षांपूर्वी सत्ता मिळाली होती आणि सध्याचे आमदारांचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक असल्याने शिवसेनेला सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक वाटा हवा, अशी आग्रही मागणी शिंदे यांनी शहा यांच्याकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिक व रायगडचे पालकमंत्रीपद, आमदारांना विकास निधी व कामे, महामंडळांचे वाटप आदी सत्तासहभागात शिवसेनेला झुकते माप मिळावे, अशी भूमिका शिंदे यांनी शहांपुढे मांडली असल्याचे समजते. शिंदे यांनी मात्र आपण शहा यांच्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगितले, तर शिंदे यांनी शहांकडे तक्रार केली नसावी. त्यांची काही तक्रार असेल, तर ते फडणवीस किंवा माझ्याशी बोलतील, आमचे संबंध चांगले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शहा हे शुक्रवारी रात्री पुण्यात आले असताना फडणवीस यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मात्र, शिंदे यांनी रात्री उशिरा फडणवीस यांच्या अनुपस्थितीत शहा यांची भेट घेतली. फडणवीस, शिंदे व पवार हे शनिवारी रायगड दौऱ्यात शहा यांच्याबरोबर होते. शहा रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुक्कामास होते, त्यावेळी फडणवीस व शिंदे हे एकत्र शहा यांना रात्री भेटतील, असे सांगण्यात येत होते. पण शिंदे ठाण्याला गेले व त्यांनी रविवारी सकाळी फडणवीस यांच्या अनुपस्थितीत शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. शहांनी शिंदे यांना दोन वेळा फडणवीस यांच्या अनुपस्थितीत भेट देऊन चर्चा केल्याने त्यावरून राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत. भाजप पक्षश्रेष्ठी शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चा करतात, हे फडणवीस यांच्यासाठीही सूचक असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीला झुकते माप मिळत असल्याची तक्रार
शिवसेनेच्या आमदारांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत समान निधी मिळत नाही, त्यांची कामे होत नाहीत, रायगड व नाशिकचे पालकमंत्रीपद देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची तयारी नाही. शिंदे यांच्या नाराजीनंतर एसटीचे अध्यक्षपद बऱ्याच दिवसांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले. महायुती सरकार चालविताना सामूहिक निर्णय प्रक्रिया व्हावी, सर्वांशी चर्चा व्हावी, अशी भाजप श्रेष्ठींची सूचना आहे. मात्र, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप मिळत असल्याची शिंदे यांची तक्रार आहे. त्यामुळे यासंदर्भात शहा यांनी शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून फडणवीस यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून काही सूचना दिल्या जातील आणि सुप्त संघर्ष व नाराजी कमी होईल, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.