लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारण्यास उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सुरुवातीला लेखी पत्राद्वारे नकार दिला होता. मात्र महासंचालक कार्यालयाने त्यांची विनंती फेटाळून त्यांनाच या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती हाती आली आहे. या चौकशीत प्रभावशील राजकीय व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तींना झालेली अटक आणि सत्ता बदलामुळे उपायुक्त नवटके यांना चंद्रपूर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पदावर बदली आणि सीबीआय चौकशीचा ससेमिरा भोगावा लागला आहे.
या पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा २०१४-१५ मध्ये उघड झाला. त्याचवेळी केंद्र सरकारच्या सहकार खात्याने या पतसंस्थेवर अवसायकाची (लिक्विडेटर) नियुक्ती केली. या अवसायकाने पतसंस्थेची मालमत्ता अल्पदरात विकून टाकली तसेच मुदत ठेवी आणि कर्ज एकरुप करण्याची बेकायदा योजना आखून बड्या कर्जदारांना लाखो रुपयांचा फायदा करुन दिला. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर या घोटाळ्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या तत्कालीन उपायुक्त नवटके यांच्याकडे सोपविण्यात आला. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी आळंदी (पिंपरी-चिंचवड) आणि शिक्रापूर (पुणे ग्रामीण) या पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला.
वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हा दाखल असल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त तसेच पुणे ग्रामीण अधीक्षकांना आदेश देऊन या प्रकरणात जळगाव येथे संयुक्त छापा टाकला. त्यानंतर हा तपास करण्याची विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आणि उपायुक्त नवटके यांना या पथकाचे प्रमुख नेमण्यात आले. परंतु नवटके यांनी पोलीस आयुक्तांमार्फत लेखी पत्र देऊन, आपल्यापेक्षाही वरिष्ठ अधिकारी असताना या पथकाचे प्रमुख आपल्याला करू नये, अशी विनंती महासंचालकांना केली. मात्र त्यांची विनंती अमान्य करण्यात येऊन त्यांचीच या पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
आणखी वाचा-मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
या घोटाळ्यात प्रभावशील राजकीय व्यक्ती लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले. मात्र तोपर्यंत सत्ताबदल झाला आणि नवटके यांचीच बदली झाली. त्यामुळे हा तपास थांबला होता. परंतु या कारवाईमुळे नवटके यांच्याविरुद्ध आरोपींनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार अर्ज दिले. हे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले होते. मात्र सत्ताबदल झाले आणि हे अर्ज पुनरुज्जीवीत झाले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र नवटके यांच्याविरुद्ध दिलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशी अहवालानुसार बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास तात्काळ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरितही करण्यात आला. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या लेखी मंजुरीनंतरच कारवाई झालेली असताना फक्त आपल्याविरुद्धच गुन्हा का, असा सवालही नवटके यांनी याचिकेतून विचारला आहे.