अभिनेता सलमान खान याने मच्छीमार कुटुंबीयांना दिलेल्या धमकीची पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. याप्रकरणी मंगळवारी फाल्कन कुटुंबीय आणि काही स्वयंसेवी संस्थांनी पाटील यांची भेट घेऊन सलमान खान, त्याचे कुटुंबीय तसेच सुरक्षा रक्षकांविरोधात लेखी तक्रार दिली. या प्रकरणात दिरंगाई का झाली, त्याचीही चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे.
सलमान खान याने २०११ मध्ये वांद्रे समुद्रकिनाऱ्याच्या चिम्बाई परिसरात ‘बेल व्ह्य़ू’ आणि ‘बेनार’ नावाचे दोन छोटे बंगले विकत घेतले होते. या बंगल्यांमधून समुद्राचे दर्शन विनाअडथळा करता यावे यासाठी तेथील स्थानिक मच्छीमार लॉरेन्स फाल्कन (६५) यांना आपली बोट आणि मच्छीमार जाळे हटविण्यासाठी सलमान खान आणि त्यांच्या अंगरक्षकांनी धमकावले होते. त्याबाबतच्या तक्रारी सप्टेंबर २०११ आणि तसेच गेल्या वर्षी मे आणि डिसेंबरमध्येही देण्यात आल्या होत्या; परंतु वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. यामुळे फाल्कन कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मंगळवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई का झाली, तसेच सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांची नेमकी काय भूमिका होती, याची संपूर्ण चौकशी परिमंडळ ९च्या उपायुक्तांमार्फत केली जाणार आहे. त्याचा अहवाल १५ दिवसांत सादर केला जाणार आहे.
दरम्यान, सलमान खानने जागेसाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता असा आरोप फाल्कन कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी दाद मागण्यासाठी गेलो असताना सलमानचे वडील सलीम खान यांनीही आपल्याला धमकावले होते. तसेच आपल्या पत्नीला सलमानच्या अंगरक्षकांनी मारहाण केली होती, असा आरोपही फाल्कन यांनी केला.