मुंबईत रोजच्या रोज अतिक्रमणे वाढत असताना पालिका प्रशासन सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बोरिवली काजूपाडा येथील मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करून खाजगी कारपार्किंग करण्याची हिम्मत काही समाजकंटकांनी केली. याविरोधात गेले वर्षभर स्थानिक मनसे आमदार प्रवीण दरेकर यांनी पालिका आयुक्तांपासून विभाग अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरवा करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सोमवारी दस्तुखुद्द भाजपचे उपमहापौर मोहन मिठबावकर, प्रभाग समिती अध्यक्षा, नगरसेवक व आ. दरेकर यांच्यासह शोकडो स्थानिक नागरिकांनी बोरिवलीच्या पालिका विभाग कार्यालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले. अखेर एक महिन्यात कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्तांना द्यावे लागले असले तरी प्रत्यक्ष कारवाईबाबत स्थानिक साशंक आहेत.
बोरिवलीच्या काजूपाडा येथील अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या आवारातील या मैदानावर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आतिक्रमण केल्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. याविरोधात मनसे व भाजपने एकत्र येऊन सोमवारी आंदोलन केले. येथे मैदान व उद्यानाचा विकास करण्यासाठी आमदार दरेकर यांनी आपल्या आमदार निधीतून पैसे उपलब्ध करून दिले होते. पालिका आयुक्त सीताराम कुंटे तसेच अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्याबरोबर अनेक बैठकाही झाल्या. मात्र येथे अतिक्रमण असल्यामुळे त्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक भाजप नेते व दरेकर यांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावाही केला. अखेर पालिकेने नोटीस दिल्यानंतर संबंधितांनी त्याविरोधात न्यायालयात जाऊन स्थगिती घेतली. विभाग अधिकारी बोले यांनी जाणीवपूर्वक कॅव्हेट दाखल न करता नोटीस दिल्यामुळे ही स्थगिती मिळाल्याचा आरोप दरेकर यांनी केला. स्थानिक नागरिकांनाही येथे नवरात्रोत्सव साजरा करता येणार नसल्यामुळे ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Story img Loader