Narhari Zhirwal : धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारल्या उड्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार किरण लहामाटे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याही समावेश आहे. पोलिसांकडून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून पेसा भरती रखडली आहे. ही भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. याशिवाय धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समिती गठीत करण्यात आली आहे. त्यासाठी कायद्याचा मसुदाही तयार केला जातो आहे. मात्र, धनगर समाजाचा समावेश आदिवासी प्रवर्गात करण्याला नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांकडून विरोध केला जातो आहे.

हेही वाचा – “सरकार आमचं ऐकत नाही, हे म्हणण्याची वेळ आली आहे”, नरहरी झिरवाळांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर!

या मुद्द्यावरून आज नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजातील आमदार आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उड्या मारल्या आहेत. या आमदारांना जाळीवरून बाहेर काढण्यात येत आहेत. मात्र, हे आमदार आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

यासंदर्भात बोलताना, “पेसा भरतीसाठी आदिवासी समाजातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मुळात ज्या आदिवासी समाजाने आम्हाला निवडून दिले, त्यांचे सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग? एकाही नेत्याने त्यांच्याकडे जाऊन बघितलं नाही. आम्ही सरकारशी चर्चा करतो आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मी आधी आदिवासी आहे. नंतर विधानसभा उपाध्यक्ष आहे”, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली. यावेळी नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाल्याचेही बघायला मिळालं.

यासंदर्भात अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी टीव्ही ९ वृत्तावाहिनीला प्रतिक्रिया दिली. “गेल्या दोन महिन्यांपासून पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी समाजातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यासंदर्भात आम्ही २९ ऑगस्ट रोजी सरकारशी चर्चा केली होती. त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणं अपेक्षित होतं. पण कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर आम्ही ३० सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन केलं होतं. त्यावेळीही दोन दिवसांत निर्णय घेऊ असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र, तरीही निर्णय झाला नाही. तेव्हापासून आम्ही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात भेटीसाठी वेळ मागतो आहे. मात्र, त्यांनी वेळ न दिल्याने आमदारांचा संजय सुटला आणि नरहरी झिरवळांसह काही आमदारांनी तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”

नरहरी झिरवळ यांनी चार दिवसांपूर्वीही आमदारांसह मंत्रालयाच्या प्रवेशाद्वारासमोर आंदोलन केले होतं. यावेळी बोलताना, “सरकार आमचं ऐकत नाही, हे म्हणण्याची वेळ आली आहे. पेसा भरती असेल, किंवा धनगरांना आदिवासींतून आरक्षण देण्याचा निर्णय असेल, याविरोधात गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, याबाबतीत निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. थेट कायदे केले जातात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy speaker narhari jhirwal and st cast mla jumped from mantralaya got stuck on safety net spb