मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळेच तपासयंत्रणा जाणूनबुजून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार करून आपल्याविरोधात त्यांचा वापर करत आहेत, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे सोमवारी करण्यात आला. तसेच वाझे यांना माफीचा साक्षीदार करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
देशमुख यांनी वैद्यकीय कारणासह अन्य कारणास्तव जामीन देण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले. त्यानुसार, सोमवारी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर देशमुख यांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर युक्तिवाद सुरू झाला. त्यावेळी बनावट चकमकी, हत्या, स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर गुन्हे वाझे यांच्यावर दाखल आहेत. त्यामुळे वाझे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाकारता येणार नाही. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवला जाणार का, असा प्रश्नही देशमुख यांच्या वतीने युक्तिवाद करताना वकील विक्रम चौधरी यांनी उपस्थित केला. देशमुखांना सध्या त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ते कारागृहात आहेत. त्यांचे वय आणि या सगळय़ा पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मंजूर करण्याची मागणीही चौधरी यांनी केली.