मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस हवालदार सुमारे सहा वर्षे कामावर उपस्थित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक तपासानंतर ही माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. रामलाल दिगंबर मंजुळे आणि समद सलीम शेख यांची २०१२ मध्ये ताडदेमधील ‘स्थानिक शस्त्र’ विभागातून मलाबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. तेव्हापासून ते गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. गैरहजर असताना देखील ६ वर्षे त्यांना पगार देखील मिळाला आहे.
चौकशीनंतर बडतर्फ करण्याचे आदेश
गुन्हेगारांना न्यायालयात नेण्यासाठी तसेच त्यांना तुरूंगात परत आणण्यासाठी कर्मचार्यांची व्यवस्था करणे तसेच अत्यावश्यक आस्थापनांमध्ये सुरक्षा पुरविण्याचे काम स्थानिक शस्त्रास्त्र विभागाकडे आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. या आदेशामध्ये जून २०१२ पासून या दोन्ही हवालदारांनी काम केले नाही. त्या दोघांची एका दिवसाआड मलबार हिल स्टेशनमध्ये बदली करण्यात आली होती. विभागीय चौकशीनंतर पोलिस उपायुक्त (झोन २) यांनी हे आदेश दिले.
‘उगाच हीरोपंती करु नका’, टायगर-दिशावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांचा इशारा
७ आणि ८ जून २०१२ रोजी ताडदेव स्थानिक शस्त्र विभागातून त्यांची बदली करण्यात आल्यानंतर मंजुळे आणि शेख यांनी मलबार हिल पोलिस स्टेशनला कधीही हजेरी लावलेली नाही. कामावर उपस्थित राहण्यासाठी त्यांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर नियमित नोटिस पाठवण्यात आल्या. दोघांनी नोटिसांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर २०१३ मध्ये दोन्ही हवालदारांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. सुरुवातीला तीन महिन्यांत त्यांच्या पगाराच्या ५० टक्के रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. नियमांनुसार, तीन महिन्यांनंतर त्यांनी आपल्या मासिक उत्पन्नातू ७५ टक्के रक्कम काढण्यास सुरुवात केली.
कामावर उपस्थित नसून देखील मिळाला ६ वर्षांचा पगार
२०१८ च्या सुरूवातीस, पोलीस विभागाला समजले की मागील सहा वर्षांपासून कामावर नसणारे दोन कॉन्स्टेबल अद्याप पगार घेत होते. त्यांचे वेतन थांबविण्यात आले आणि त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू केली. वरिष्ठ अधिकार्यांकडून कोणतीही पूर्वसूचना न घेता हे दोन्ही हवालदार कामावर गैरहजर राहिले असे या तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. २९ सप्टेंबर २०२० रोजी त्यांची पहिली कारणे दाखवा नोटीस मंजुळे यांना बजावण्यात आली. त्यांनी या नोटिसला प्रतिसाद दिला नाही, तर शेख यांनी २७ मार्च २०२१ रोजी दिलेल्या नोटिशीला उत्तर दिले.
मुंबई : चौपाटीसह शहरातील गस्तीसाठी आता पोलिसांना मिळाली अत्याधुनिक ATV वाहने
विभागीय चौकशीदरम्यान हजर रहायला सांगण्यासाठी मंजुळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेख चौकशी दरम्यान हजर झाले परंतु अधिकाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या उत्तरांनी समाधानकारक वाटले नाही. या दोन्ही कॉन्स्टेबलने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील सेवेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे असा चौकशीत निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर त्यांना बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. मंजुळे व शेख यांना बडतर्फ करण्याचा आदेश मुंबई पोलिस (शिक्षा व अपील) १९५६ च्या नियम ३ अंतर्गत २ जून रोजी जारी करण्यात आला.
“२०११ मध्ये माझा अपघात झाला होता. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो होतो पण २०१२ मध्ये माझ्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे बेशुद्ध पडलो. मी दिलेल्या उत्तरात (कारणे दाखवा नोटीस) वैद्यकीय अहवाल जोडले आहेत. तरीही त्यांनी माझ्या कुटुंबाचा विचार केला नाही आणि मला बडतर्फ केले” असे शेख यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.