लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून येऊनही केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणे यांना वगळण्यात आले. अडीच वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत राणे फारसा प्रभाव पाडू न शकल्यानेच त्यांना डच्चू देण्यात आल्याचे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येते.

नारायण राणे हे गेली अडीच वर्षे लघू, सूक्ष्म उद्याोग खात्याचे मंत्री होते. लोकसभेवर निवडून आल्याने मंत्रिमंडळात पुन्हा समावेश केला जाईल, असा त्यांना ठाम विश्वास होता. पण मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळात राणे यांना संधी देण्यात आलेली नाही. भाजपने राणे यांना राज्यसभेची पुन्हा उमेदवारी नाकारली होती. लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्याची गळ त्यांना घालण्यात आली. तब्येत साथ देत नसल्याने राणे हे लोकसभा निवडणूक लढण्याबाबत फारसे उत्सुक नव्हते.

हेही वाचा >>>Video: “जर एअर इंडियानं विमानाचं उड्डाण थांबवलं असतं तर?” मुंबई विमानतळावरील धक्कादायक प्रकार; नेटिझन्सकडून संतप्त प्रतिक्रिया!

विधानसभा निवडणुकीत लागोपाठ दोन पराभवानंतर राणे यांनी राज्यसभा अथवा विधान परिषद या दोन सभागृहांत मागील दारानेच प्रवेश केला होता. पराभवाचा शिक्का पुसून काढण्यासाठी नारायण राणे यांनी विजयाकरिता सारी ताकद पणाला लावली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात राणे हे ५० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले.