शैलजा तिवले

मुंबई : मनोविकार हा बरा होत असला तरी समाजाचा या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे चित्र  मनोरुग्णालयांत कुटुंबीयांकडूनच वाळीत टाकण्यात आलेल्या रुग्णांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.  ठाण्याच्या मनोरुग्णालयात जवळपास २६७ रुग्ण हे नातेवाईक न्यायला न आल्यामुळे एक वर्षांहूनही अधिक तिथेच वास्तव्य करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ३९ टक्के रुग्ण बरे होऊनही दहा वर्षांहूनही अधिक काळ घरी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ठाण्याचे मनोरुग्णालय हे विभागीय असून येथे ठाणे, मुंबईसह शहापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथूनही रुग्ण दाखल होतात. दर दिवशी रुग्णालयात सुमारे दहा रुग्ण दाखल होतात. १८०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या सुमारे साडे नऊशे रुग्ण सध्या दाखल आहेत. यातील सुमारे तीन टक्के रुग्ण बरे झाले असले तरी घरच्यांनी नाकारल्यामुळे तिथेच वास्तव्यास आहेत.

रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला मनोरुग्णालयात न ठेवता समाजात त्याचे पुर्नवसन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने काही संस्था नेमून दिल्या आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अशा १२५ रुग्णांना या संस्थांमध्ये आम्ही राहण्यास पाठविले आहे. आणखी काही रुग्णांसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले.

नेत्यांचाही वशिला..

रुग्ण बरे झाल्यावर आम्ही त्याला घरी नेण्यासाठी कुटुंबीयांचा मागे लागतो. परंतु नातेवाईक रुग्ण बराच काळ रुग्णालयातच कसा राहील यासाठी प्रयत्न करत असतात. यासाठी अगदी मंत्री, आमदार, खासदारांचा वशिला, पत्र घेऊनही नातेवाईक येतात, असे समुपदेशांनी सांगितले.

पत्ता, दूरध्वनी चुकीचा..

रुग्ण बरे झाल्यानंतर त्याला घरी पाठविण्यासाठी रुग्णालयाचा पाठपुरावा सुरू असतो. कुटुंबीयांचे फोन बंद असतात, काही कुटुंबे घर विकून दुसरीकडे राहायला जातात, घराचा किंवा अन्य पत्ता, संपर्क क्रमांक चुकीचे दिलेले असतात असे अनेक अनुभव आता रुग्णालयाला सवयीचे झाले आहेत.

आमच्या रुग्णालयातून सुमारे ८० टक्के रुग्ण बरे होतात आणि घरी जाऊ शकतात. पण आता तो बरा दिसतो, घरी गेल्यावर पुन्हा तसाच वागेल, अशी कारणे बहुतांश नातेवाईक सांगतात.  त्यामुळे अगदी ४० वर्षांपासून काही रुग्ण रुग्णालयातच राहिलेले आहेत.

– डॉ. संदीप दिवेकर, रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधिक्षक

नातेवाईक अनुत्सुक..

  रुग्णाला पत्ता सांगता आल्यास त्या भागातील पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयाचा शोध घेतला जातो. परंतु नातेवाईकांशी संपर्क साधल्यावर तेही रुग्णाला नेण्यास फारसे उत्सुक नसतात. नातेवाईकांचे अनेकदा समुपदेशन केल्यावर अखेर रुग्णांना घरी पोहोचवण्यात येते. परंतु नातेवाईकांची मानसिकता त्यांना पुन्हा स्वीकारण्याची नसते, असा अनुभव रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षकांनी सांगितला.

 बरे झाले तरी रुग्णालयात वास्तव्य करणाऱ्या रुग्णांची संख्या

वास्तव्याची वर्षे रुग्णांची संख्या

१ ते २ ४३

२ ते ५  ७८

५ ते १० ४२

१० ते २०   ३९

२० वर्षांहूनही अधिक काळ……६५

बदलती मानसिकता..

इतर शारीरिक आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे मनोरुग्णालयातील रुग्ण बरा झाल्यावर त्याला कुटुंबीयांनी परत नेणे अपेक्षित आहे. परंतु जबाबदारी झटकून त्याच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठीचे ठिकाण म्हणजे मनोरुग्णालय असा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन गेल्या अनेक वर्षांपासून झालेला आहे.

सामाजिक भीती..

घरात मनोरुग्णाला कसे सांभाळायचे,  लोक आपल्या कुटुंबात मनोरुग्ण असल्यामुळे आपल्याकडे कसे पाहतील, या सामाजिक भीतीमुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्ण बरा झाला तरी त्याला पाहायला येण्याचे नाकारत असल्याचे चित्र वाढत आहे.

Story img Loader