मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा या निवासस्थानाशेजारी असलेल्या बंगल्याचा डॉइच बॅंकेने लिलाव जाहीर केला आहे. या लिलावासाठी बंगल्याची आरक्षित किंमत २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या परिसरात अशा स्वरूपातील मालमत्तेची किंमत ३५ ते ४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. हा बंगला दोन हजार १२५ चौरस फुटांच्या भूखंडावर असून एक हजार १६४ चौरस फुटाचे प्रत्यक्ष बांधकाम आहे. येत्या २७ मार्च रोजी जाहीर लिलाव होणार आहे. सरफेसी कायद्यानुसार (सिक्युरिटायझेन ॲंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अॅंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट) मिळालेल्या अधिकारात हा लिलाव होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : निकालांपासून विद्यार्थी दूरच, वर्षभरानंतरही दूरस्थ; ऑनलाइन शिक्षण केंद्राचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत
सेव्हन स्टार सॅटेलाईट प्रा. लि. यांना कर्जापोटी १२ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी ६० दिवसात भरण्यासाठी डॉइच बॅंकेने एप्रिल २०२२ मध्ये नोटिस बजावली होती. परंतु कंपनीने थकबाकीची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे बॅंकेने तारण ठेवण्यात आलेली ही मालमत्ता ताब्यात घेतली. आता या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. अनामत रक्कम म्हणून अडीच कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. आतापर्यंत १५ खरेदीदारांनी या लिलावात रस दाखविला आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या मालमत्तेला २५ कोटींपेक्षा निश्चित मोठी रक्कम येईल, असा दावा स्थानिक इस्टेट एजंटने केला आहे. या भूखंडावर इमारत उभारता येणार नसली तरी खासगी बंगला किंवा व्यापारी वापर करता येऊ शकणार आहे.
हेही वाचा >>> जी.टी, कामा रुग्णालयाचे संयुक्त वैद्यकीय महाविद्यालय; वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता
जुहू परिसरातील बाजारभाव हा प्रत्येक मालमत्तानजिक बदलत असतो. साधारणत: ५० ते ७० हजार रुपये चौरस फूट दराने घरांची विक्री होते. परंतु हा बंगला भूखंडासहीत असून याच परिसरात एव्हढाच परिसर ३५ ते ४० कोटींना सहज विकला गेला असता. बॅंकेकडून लिलाव केला जातो तेव्हा बाजारभावाच्या २५ ते ३० टक्के दर आरक्षित किंमत म्हणून निश्चित केला जातो. त्यामुळे या मालमत्तेच्या लिलावाला जोरदार प्रतिसाद मिळेल, असे लिलावाची प्रक्रिया राबविणाऱ्या हेक्टा या एजन्सीला वाटत आहे. विलेपार्ले येथील सात हजार चौरस फूट भूखंडावरील ३६०० चौरस फुटांचा बंगला फेब्रुवारी महिन्यात १०१ कोटींना विकला गेला होता. खार येथील पाच हजार चौरस फुटाचा बंगला डिसेंबर महिन्यात ७० कोटींना विकला गेला. याबाबत सेव्हन स्टार सॅटेलाईट प्रा. लि. शी संपर्क होऊ शकला नाही. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्याचा दावा या कंपनीतील एका अधिकाऱ्याने केला.