लवकरच निर्णय होण्याची शक्यता
मुंबई : एक खासगी विकासक कर्जतमधील शेलू येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १० हजार घरांचा प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पातील दोन हजार घरे म्हाडाला देण्याची तयारी विकासकाने दाखवली आहेेत. ही घरे १९ महिन्यांत बांधून देण्याचे आश्वासनही विकासकाने दिले आहे. यासंदर्भात म्हाडाचे कोकण मंडळ आणि गिरणी कामगार संघटना यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी कामगार संघटनांनी या घरांना अनुकूलता दर्शविली. असे असले तरी यासंदर्भातील सर्व बाबींचा विचार करून म्हाडा अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.
हेही वाचा >>> विश्लेषण: मुंबई महापालिकेत औषध, आरोग्यसाहित्य मध्यवर्ती खरेदी वादाच्या भोवऱ्यात का सापडली?
अंदाजे पावणेदोन लाख गिरणी कामगारांनी म्हाडाकडे घरांसाठी अर्ज केले आहेत. मात्र यातील जेमतेम २५ हजार गिरणी कामगारांनाच राज्य सरकार म्हाडाच्या माध्यमातून घरे देऊ शकणार आहे. त्यामुळे दीड लाख गिरणी कामगारांना कुठे आणि कशी घरे द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार आणि म्हाडा विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यानुसार अशी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा आणि गिरणी कामगार सनियंत्रण समिती चाचपणी करीत आहे. असे असतानाच कर्जतमधील शेलू येथील एक विकासक पुढे आला असून या विकासकाने आपल्या ‘पीएमएवाय’ योजनेतील दोन हजार घरे देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सनियंत्रण समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांनी दिली. मे. अजान होम हा विकासक शेलू येथे ‘पीएमएवाय’ योजनेतील घरे बांधत आहे.
हेही वाचा >>> मुंबई: हाफकिन महामंडळाला कायमस्वरुपी संचालकांसाठी द्या; कामगार संघटनेचे थेट मंत्री व सचिवांना पत्र
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार घरे बांधण्यात येणार आहेत. ही सर्व घरे गिरणी कामगारांना देण्याची तयारी या विकासकाने दाखवली आहे. यासंबंधी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत गिरणी कामगार संघटनांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र सध्या ही चर्चा प्राथमिक स्तरावर असून प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर कामगारांची पसंती आणि घरांच्या किंमती विचारात घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले.