‘पर्यावरणीय असंतुलन आणि आपण’ परिसंवादातील सूर
भविष्यातील आपत्तींची पेरणी करणे थांबवायचे असेल, तर विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे. या विकासात निसर्गातील लहान-मोठे प्राणी, पक्षी, कीटक यांचाही तसेच पर्यावरणीय असंतुलानामुळे होणारे विविध आजारही कसे टाळता येतील, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असा सूर ‘लोकसत्ता’ आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’या कार्यक्रमात ‘पर्यावरणीय असंतूलन’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
परिसंवादात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या माजी पशुवैद्यक अधिकारी डॉ. विनया जंगले, केईएम रुग्णालयातील सामाजिक वैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. कामाक्षी भाटे आणि पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर सहभागी झाले होते. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी प्राजक्ता कासले यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
माणूस, निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील द्वैत मोडून या सगळ्याचा साकल्याने आणि समग्रतेने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून देऊळगावकर म्हणाले, पर्यावरणीय असंतूलनामुळे निर्माण झालेल्या समस्यांमधून तोडगा काढण्यासाठी आपल्याला दोन पातळ्यांवर विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली जीवनशैली संपूर्णपणे बदलावी लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. जंगले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या जागेवर किंवा निवासस्थानांवर मानवाने आक्रमण केल्यामुळे मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षांला सुरुवात झाली आहे. पर्यावरण म्हणजे केवळ जंगल नव्हे तर पाळीव प्राणी हादेखील पर्यावरणाचा घटक आहे, अशा विविध विषयांचा परामर्श त्यांनी घेतला.
तर, शहरी भागांत वाढलेली बेसुमार लोकसंख्या, त्यामुळे ढासळलेले पर्यावरणाचे संतुलन आणि त्यातून उद्भवणारे आजार यांची सांगड घालत डॉ. कामाक्षी भाटे यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. पर्यावरणीय असंतुलनाचा माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून याचा पद्धतशीर आणि योग्य पद्धतीने अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
पाण्यावर समग्र सृष्टीचा समान हक्क आहे हे मान्य करायलाच हवे. एवढेच नव्हे तर त्या हक्कानुसार कृती बदलायला हवी
– अविनाश कुबल, उपसंचालक, महाराष्ट्र निसर्ग उद्यान
मंगळावर पाणी सापडल्याने आपल्याला जे कुतुहल वाटते ते वैज्ञानिक तहान भागवण्यासाठी पुरेसे आहे. अशीच १५ ते २० टक्के काळजी जर पृथ्वीवरील पाणी वाचवण्यासाठी सर्वानी घेतली तर अनेक प्रश्न सुटतील.
– सचिन वझलवार, जल अभ्यासक
भूतलावरील प्रत्येक सजीवासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. त्याची राखण झालीच पाहिजे. दुष्काळी भागांत तर ही बाब प्रकर्षांने जाणवते. त्यासाठी जल कार्यकर्त्यांची मोठय़ा प्रमाणात गरज आहे. मनुष्यकेंद्रीत पाण्याच्या नियोजनाची गरजही मोठी आहे.
– डॉ. प्रसन्न पाटील, जल कार्यकर्ता
प्राणी व मनुष्य यांच्यातील संघर्ष हेच पर्यावरणीय असंतुलनाचे द्योतक आहे. मनुष्य प्राण्यांच्या आवासावर अतिक्रमण करतो, त्यांच्या खाद्याचे स्रोत कमी करतो आणि त्यातून हा संघर्ष निर्माण होतो. मात्र यात फक्त जंगली प्राण्यांचाच विचार करण्याऐवजी पाळीव प्राण्यांचाही विचार झाला पाहिजे. गेल्या काही वर्षांत पाळीव प्राण्यांच्या पोटात प्लॅस्टिकचे तुकडे मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. जंगली प्राणी, पाळीव प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कीटक, गवत, झुडुपे हे सर्वच पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
– डॉ. विनया जंगले, पशुवैद्यक अधिकारी.
रोग पसरवणारे, रोगापासून पीडित होणारे आणि पर्यावरण ही एक साखळी आहे. पर्यावरण बिघडले की, रोगापासून पीडित होणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याच वेळी रोग पसरवणाऱ्या जीवाणू, विषाणू यांची शक्ती वाढते. त्यामुळे ही साखळी संलग्न आहे.
– डॉ. कामाक्षी भाटे, सामाजिक वैद्यकीय विभाग प्रमुख (केईएम रुग्णालय)
ज्या फांदीवर बसलो आहोत, तीच फांदी तोडणाऱ्या इतिहासातील शेख चिल्लीचे आपण वंशज आहोत. गावांच्या शहरीकरणातून प्रदूषण आणि त्यामुळे पर्यावरण यांच्या समस्या उद्भवत आहेत. आपली आधुनिकता बाह्य़ांगापुरती आहे. मात्र या सगळ्या आव्हानांचा समग्रतेने विचार करायला हवा. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. – अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ