पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ म्हणजेच विशिष्ट परिसरातील इमारतींचा सामूहिक विकास ही संकल्पना चांगली असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मालक-रहिवासी यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन वास्तुरचनाकार नीरा आडारकर यांनी केले. तसेच या पुनर्विकासात सुनियोजित वसाहतीला आवश्यक सोयीसुविधा विकासक देतो की नाही याकडे बारकाईने लक्ष ठेवणेही रहिवाशांची जबाबदारी ठरते याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘चिंतामणी ट्रस्ट’च्या सहयोगाने सुरू असलेल्या मुक्त शब्द मासिक आयोजित ‘शब्दगप्पा’चा समारोप ‘पुनर्विकासा’वरील परिसंवादाने झाला. त्यावेळी पुनर्विकासाशी संबंधित विविध पैलूंचा ऊहापोह करण्यात आला. नीरा आडारकर यांच्यासह पालिकेचे निवृत्त उपमुख्य अभियंता श्रीनिवास जोशी, वास्तुरचनाकार चंद्रशेखर, ‘म्हाडा’च्या दुरुस्ती मंडळाचे उप मुख्य अभियंता राजीव शेठ तसेच निवासी कार्यकारी अभियंता महिषी आदींनी या परिसंवादात सहभाग घेतला. महापालिकेचे आयुक्त सिताराम कुंटे, म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी आयत्यावेळी या परिसंवादाकडे पाठ फिरवून शेकडो रहिवाशांची निराशा केली. या परिसंवादाचे सूत्रसंचालन पत्रकार निशांत सरवणकर आणि नितीन चव्हाण यांनी केले. पुनर्विकास ही एक संकल्पना असली तरी झोपडपट्टी, चाळी, इमारती, वसाहती या विविध प्रकारांसाठी वेगवेगळे नियम व अटी आहेत. ते समजून घेऊन पुढचे पाऊल उचलणे आवश्यक आहे. सामूहिक विकासासाठी त्या परिसरातील अनेक इमारतींच्या रहिवाशांचे मनोमिलन आवश्यक आहे. ते अनेकदा कठीण असते, असे आडारकर यांनी सांगितले. तर पुनर्विकासातील फसवणूक आणि रखडपट्टी टाळण्यासाठी नऊ जानेवारी २००९ च्या अधिसूचनेचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा करावा, असा सल्ला चंद्रशेखर यांनी दिला.