मुंबई : मुंबईतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या भायखळा मतदारसंघातील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) मनोज जामसुतकर त्यांना शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) पक्षाच्या यामिनी जाधव यांचे आव्हान आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यावर भर दिला आहे.

‘आम्ही करून दाखवलंय’ या ब्रीदवाक्याखाली मनोज जामसुतकर यांनी आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रचारादरम्यान तसेच डिजिटल स्वरुपात समाजमाध्यमांवर मांडला आहे. विद्युत रोषणाई, स्वतंत्र अमृत महोत्सव शिल्पाचे नूतनीकरण, महिलांसाठी प्रशिक्षण योजना, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, जलवाहिनीची कामे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, विद्यार्थी अभ्यासिका, मोफत वाचनालय, पाणीपुरवठा हे मुद्दे ते प्रचारादरम्यान मतदारांसमोर मांडत आहेत. तर यामिनी जाधव यांनी ‘का यामिनी पुन्हा’ या ब्रीदवाक्याखाली महिला पोलिसांचा गणवेश बदलाबाबतची मागणी, महिलांना स्वयंरोजगाराची संधी, वाहतूक प्रश्न, भायखळ्याचा विकास, शैक्षणिक उपक्रम, पाणीप्रश्न आदी मुद्दे मांडले आहेत.

हेही वाचा – पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी प्रचारादरम्यान मुख्यत: मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यावर भर दिला आहे. उमेदवारांच्या कार्यअहवालात आजवर केलेली कामे छायाचित्रांसह प्रसिद्ध केली आहेत. ‘जहॉं भी सवाल हो जन-कल्याण का, वहॉं होगा साथ मनोज का’, ‘प्रत्येक कृती, प्रत्येक पाऊल भायखळ्याच्या विकासासाठी’, ‘जनतेचा श्वास राजकारणातला विश्वास मनोज जामसुतकर’, तसेच ‘यामिनी फिर से… कहे म.न.से.’, ‘विश्वास जुना म्हणूनचं यामिनीताई पुन्हा’, ‘काम बोलतंय’, ‘दमदार आमदार’ या घोषवाक्यांचा वापरही करण्यात आला आहे. निवडून आल्यानंतर पुन्हा जोमाने विकासकामांवर भर देणार असल्याचे आश्वासन यामिनी जाधव यांनी दिले आहे.

हेही वाचा – मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार

विकासकामांची माहिती क्यू आर कोडद्वारे

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मनोज जामसुतकर यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची माहिती मतदारांना पाहता यावी यासाठी क्यूआर कोडचा वापर केला आहे. या क्यूआर कोडबाबत सध्या समाजमाध्यमावर जोरदार चर्चेत सुरू आहे.