खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवावी, असं आव्हान राणांनी दिलं होतं. नवनीत यांच्या आव्हानावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मुळात मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. पण त्यांना अॅम्प्लिफायरकडून ही ऊर्जा मिळत असल्याची टीका किशोरी पेडणेकरांनी केली. त्यामुळे हे अॅम्प्लिफायर कोण आहेत?, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
मुख्यमंत्र्यांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या की, “बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्यातील लोकांबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलल्याशिवाय या लोकांना प्रसिद्धी मिळत नाही. हे सगळं प्रसिद्धीसाठी आहे. आपण पाहिलं की गेल्या दोन दिवसांत नवनीत राणांना कोण जाऊन भेटलं ते सगळे अॅम्प्लिफायर आहेत आणि ही तिकडची ऊर्जा आहे. पण आम्हाला आम्हाला फरक पडत नाही, अशा आव्हानांमुळे शिवसेना अजून उजळून निघेल.” किशोरी पेडणेकर यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी भाजपाच्या नेत्यांना अॅम्प्लिफायर म्हटल्याचं दिसंतय. कारण नवनीत राणा रुग्णालयात असताना भाजपा नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी राणांची भेट घेतली होती.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
“गाय किंवा म्हैस पळवायची असेल तर विरुद्ध दिशेला घंटा वाजवला जातो, त्याप्रमाणेच भाजपाकडून विरुद्ध दिशेला हा भोंगा आणि सोंगा वाजवला जातोय. महागाई वाढलीये, त्यावर बोलायचं नाही, १५ लाखांवर बोलायचं नाही, अच्छे दिन कधी येणार यावर बोलायचं नाही. तसेच यावर दुसऱ्यांनी बोलू नये म्हणून म्हैस पळवली जाते, घंटा आणि भोंगा-सोंगा वाजवला जातो. उद्धव ठाकरे हे त्यांच्या चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नाही तर देशातही अव्वल आले, ती खरी दोघांचीही पोटदुखी आहे, एकाचा भोंगा आहे तर दुसऱ्याचा सोंगा आहे आणि अॅम्प्लिफायर तर वेगळाच आहे,” असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यासह राज ठाकरेंवर आणि भाजपावर निशाणा साधला.