आळंदीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, ही वस्तुस्थिती नाही. वारकऱ्यांवर कोणतेही सरकार लाठीचार्ज करत नसते, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाली, ही वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्रात कोणतेही सरकार वारकऱ्यांवर लाठीचार्ज करत नसते. गेल्यावर्षी आळंदीतील मंदिरात प्रवेश दिल्यावर महिलांच्या अंगावर महिला पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे यंदा वरिष्ठ पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, ५६ दिंड्यांचे प्रमुख आणि मंदिरांच्या विश्वास्तांची बैठक झाली. त्यात ५६ दिंड्यांना प्रत्येकी ७५ पास द्यायचे. त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा आणि नंतर बाकीचे प्रवेश सुरु करायचे, असं ठरलं होतं. या निर्णयानंतर ६५ दिड्यांचे प्रत्येकी ७५ लोक मंदिरात होते.”
“तेव्हाच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी मंदिराबाहेर जमा झाले. विद्यार्थ्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. पण, ६५ दिंड्यानंतर तुम्हाला प्रवेश देऊ, असं सांगितल गेलं. पोलीस, नागरिक, संस्थेचे चोपदार आणि पालकी प्रमुखांनी विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी विनंती केली. मात्र, ते ऐकण्यास तयार नव्हते. विद्यार्थीं बॅरिगेट्स तोडून पोलिसांच्या अंगावर धावले. तरीही त्यांना थांबवण्यात आलं. पुन्हा बॅरिगेट्सपर्यंत माघारी आणलं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियात पसरवण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ दाखवले. मात्र, त्यात कुठेही लाठीचार्ज झाला नाही. एका वारकऱ्याने स्वत: पोलीस ठाण्यात सांगितलं की, पोलिसांनी वारकऱ्यांना कोणतीही मारहाण केली नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.