मुंबई : कसब्यातील जनादेशाचा स्वीकार आम्ही करीत असून आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर आधीच्या निवडणुकांमध्ये दोन-तीनदा पडल्याने रवींद्र धंगेकरांना जनतेची सहानुभूती होती, ती महाविकास आघाडीला नव्हती. हेमंत रासने यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली. पण आम्हाला पराभव मान्य असून कोठे कमी पडलो, कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, याचे विश्लेषण करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, कसब्यातील जनतेचे आम्ही आभारी असून त्यांनी आम्हाला थोडे कमी आशीर्वाद दिले. तरी आम्ही जनादेशाचा स्वीकार करतो. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयी झाल्याने त्यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले असून विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासीयांचे त्यांनी आभार मानले आहेत. हा विजय म्हणजे लक्ष्मण जगताप यांना आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पराभव मान्य : बावनकुळे
कसब्यातील पराभव आम्हाला मान्य आहे. गेल्या २८ वर्षांपासून येथे आम्ही जिंकत होतो, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा गड उद्ध्वस्त झाला होता का? प्रत्येक निवडणुकीत वेगळी समीकरणे असतात. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे. आम्ही संस्काराने लढणारे असून पैशांचा वापर करून लढत नाही, तो आमचा धर्म नाही, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला. जे स्थानिक मनसे कार्यकर्ते धंगेकरांचे काम करीत होते, त्यांना पक्षातून काढले. पण आम्ही चिंचवड पोटनिवडणूक जिंकलो, विधान परिषद निवडणुकीत कोकणात जिंकलो, तीन हजार ग्रामपंचायती जिंकलो. नागपूरची जागा आम्ही लढवीत नाही. गेली १० वर्षे शिक्षक परिषद लढते व आम्ही पाठिंबा देतो. अमरावती व कसब्यातील पराभव मान्य असून त्याचे विश्लेषण आम्ही करणार आहोत. जर कसबा व चिंचवड दोन्ही जागा जिंकल्या असत्या, तर महाराष्ट्र जिंकू, म्हणता येईल का? कसब्यातील विजय महाविकास आघाडीचा नसून धंगेकरांचा आहे. जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी धंगेकरांनी प्रचार संपल्यावर उपोषण केले, त्याचा त्यांना सहानुभूती मिळविण्यासाठी फायदा झाला. या संदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेईल, ते पाहावे लागेल, असे बावनकुळे यांनी नमूद केले.