राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा आरोप केलाय. तसेच सरकारमध्ये सगळे केवळ पैशांच्या पाठिमागे लागल्याचा आरोप करत सरकारचे मंत्री पैशांचा हव्यास करू लागले तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. ते झी २४ ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते. राज्य गव्हर्नंसवर ठरतं. आज महाराष्ट्रात गव्हर्नंस नावाची कोणतीही गोष्ट पाहायला मिळत नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोस्टिंग केवळ पैशांच्या आधारे होते आणि मेरिट डावललं जातं, तेव्हा तो अधिकारी पैसे कसे काढता येतील याचा विचार करतो. अशावेळी भ्रष्टाचाराची एक मालिका सुरू होते. यातून मग खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात.”
“…तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही”
“मी पुराव्यांसह सभागृहात अनेक घोटाळे मांडले, पण सरकार त्यावर समर्पक उत्तर देऊ शकलं नाही. आज एकएक विभागाचा घोटाळा पाहिला तर खूप मोठा आहे. सगळे केवळ पैशांच्या पाठिमागे लागले आहेत. सरकारचे मंत्री, लोकं इतका पैशांचा हव्यास करू लागले तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
“बाहेरचा गुंतवणूकदार महाराष्ट्रात येतो तेव्हा तो घाबरतो”
फडणवीस पुढे म्हणाले, “आज महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशात बघा. एक तर पोलीस विभागातील बदली आणि पोस्टिंगचे घोटाळे झालेत त्यामुळे आमची प्रतिमा खराब झालीय. आता जेव्हा बाहेरचा गुंतवणूकदार महाराष्ट्रात येतो तेव्हा तो घाबरतो. इथं गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात खंडणी द्यावी लागेल असं वाटतं.”
“सरकारच्या तिजोऱ्या लुटण्याचं काम सुरू आहे. एक एक टेंडर मॅनेज करण्यात येतंय. पदाचा दुरुपयोग पाहायला मिळत आहे. असं या आधीच्या कुठल्याही सरकारमध्ये मी पाहिलेलं नाही,” असंही फडणवीसांनी म्हटलं.