नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्याकडे सापडलेली कोटय़वधी रुपयांची मालमत्ता ही आश्चर्यकारक असून ही मालमत्ता केवळ चिखलीकर यांची असणे शक्य नाही. चिखलीकर हे नेमके कोणाचे ‘वसूलदार’ म्हणून काम करतात याची चौकशी करण्याची गरज आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या चौकशीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १४ कोटींपेक्षा अधिक मालमत्ता आढळून आली. चिखलीकरांकडे सापडलेल्या मालमत्तेचा तपशील वाढतच चालला आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडे इतक्या प्रचंड प्रमाणात संपत्ती असल्याच्या प्रकरणावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
या पाश्र्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीकरांकडील संपत्तीच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित केले.
कार्यकारी अभियंत्यासारख्या पदावरील व्यक्तीकडे इतक्या मोठय़ाप्रमाणात आपली संपत्ती असणे जवळपास अशक्य आहे. असा अधिकारी निश्चितच अन्य कुणासाठी तरी पैसे गोळा करण्याचे काम करत असला पाहिजे. त्यातूनच इतक्या मोठय़ा प्रमाणात पैसा उघड झाला आहे. त्यामुळे चिखलीकर हे नेमके कोणाचे ‘फंट्र मॅन’ (वसूलदार) म्हणून काम करतात असा सवाल करत या दिशेने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा