महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीसचे मंत्री गैरहजर असल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी गैरहजर संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? असा सवाल केला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. ते बुधवारी (१५ मार्च) विधानसभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवारांनी जी बाब उपस्थित केली ती गंभीरच आहे. मी त्याचं अजिबात समर्थन करणार नाही. उलट आज सभागृहात जो प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो.”
“‘ऑर्डर ऑफ द डे’ रात्री एक वाजता निघत नाही”
“काल रात्री एक वाजेपर्यंत सभागृह चाललं. त्यामुळे ‘ऑर्डर ऑफ द डे’ रात्री एक वाजता निघाला. तो एक वाजता निघत नाही. अध्यक्ष रात्री नऊ किंवा १० वाजता ऑर्डर ऑफ द डे काढतात. अडचण अशी आहे की त्यानंतर मंत्र्यांना आढावा घ्यावा लागतो. तो आढावा मंत्र्यांनी कधी घ्यायचा हा प्रश्न असतो,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“मंत्र्यांना आढावा घ्यायला वेळच मिळत नाही”
फडणवीस पुढे म्हणाले, “अशावेळी साडेनऊ वाजता लक्षवेधी लागल्या तर मंत्र्यांना आढावा घ्यायला वेळच मिळत नाही. आम्ही मंत्र्यांना जरूर समज देऊ. त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. अध्यक्षांनाही विनंती आहे की, एखाद्या दिवशी उशिरापर्यंत कामकाज चालत असेल, तर आधी ऑर्डर ऑफ द डेची असुधारित प्रत पाठवून द्यावी. त्यामुळे सकाळच्या लक्षवेधींचं ब्रिफिंग घेता येईल. याबाबत अध्यक्षांनी निर्देश द्यावेत.”
“अपवादात्मक परिस्थिती सोडता सर्व मंत्री उपस्थित राहतील”
“मी सभागृहाला आश्वस्त करतो की, अपवादात्मक परिस्थिती सोडता सर्व मंत्री उपस्थित राहतील,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.
हेही वाचा : VIDEO: “यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का?”, अजित पवार अधिवेशनात संतापले, म्हणाले…
व्हिडीओ पाहा :
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, “आज सभागृहात केवळ मंगलप्रभात लोढांची लक्षवेधी झाली. सहा मंत्री गैरहजर होते. यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? अशाप्रकारचे शब्द वापरताना आम्हालाही वाईट वाटतं. काल रात्री एक-दीड वाजेपर्यंत लोक बसली. सकाळी ज्यांची लक्षवेधी होती ते दोन्हीकडील आमदार आले आणि मंत्रीच उपस्थित नाही. मंत्र्यांना असं काय काम आहे?”
“आम्हाला मंत्री करा म्हणून मागेमागे पळता आणि मंत्री झाल्यावर…”
“या मंत्र्यांना मंत्री करताना मागेमागे पळता. हे मी म्हणत नाही, सकाळी कालीदास कोळंबकरांनी सांगितलं. हे मंत्री होण्यासाठी पुढे-पुढे जातात, आम्हाला मंत्री करा म्हणून सांगतात आणि मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाहीत आणि दिलेलं वैधानिक काम करत नाहीत,” अशी तक्रार अजित पवारांनी केली.
हेही वाचा : राष्ट्रवादीनेच जुनी पेन्शन बंद केली असं म्हणताच अजित पवार संतापले; शरद पवारांचं नाव घेत म्हणाले, “अरे बाबा…”
“देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो, पण त्यांचंही…”
“देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो. त्यांना उच्चविद्याविभूषित अशी नावं दिली आहेत, पण त्यांचंही लक्ष नाही. त्यांनी त्यांच्या काही मंत्र्यांना सांगावं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे त्यांना सकाळी लवकर येण्याची अडचण आम्ही समजून घेतो. मात्र, चंद्रकांत पाटील रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी सकाळी लवकर उठून आलं पाहिजे. संबंधित ज्यांची लक्षवेधी आहे त्यांनी आलं पाहिजे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.